गेल्या पाच दशकांहून अधिक काळ तुम्ही लिहीत आहात. वयाच्या या टप्प्यावर लेखन आणि जीवनप्रवासाकडे वळून पाहताना मनात काय भावना आहेत? हो. इयत्ता दहावीत असताना मी पहिली कथा लिहिली. आजही हात लिहिता आहे. स्वत:मधला लेखक सापडला तेव्हा मराठीचा प्राध्यापक व्हायचे असे मनोमन ठरवले आणि तसा झालोही. प्राध्यापकी ही लेखनासाठी पोषक असते असे मी मानतो. पुढे तीस वर्षे प्राचार्यपदही भूषवले. या काळात वैजापूरच्या महाविद्यालयात तरुणांच्या लेखनक्षमता वाढविण्यासाठी मी विविध उपक्रम केले, कार्यशाळा घेतल्या. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदीही कार्यरत होतो. या काळात महानगरातच कार्यरत असलेले मंडळ खेड्यापाड्यात पोहोचवले. नवलेखकांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहिलो. १९९८ पासून शेतकरी साहित्य पुरस्कार देतो आहे. शांत-संथ आयुष्य जगलो. मागे वळून पाहताना कृतार्थता वाटते. कसलीच खंत मनाशी नाही. एकसष्टी साजरी करतानाही मी स्वत:चा सत्कार करवून घेण्याऐवजी माझ्यासाठी गुरुतुल्य असणाऱ्यांसाठी कृतज्ञता अभिव्यक्ती सोहळा घेतला होता. या वळणावरही अशीच एक अभिनव कल्पना मनाशी आहे. लवकरच ती मूर्त रुपात आणणार आहे. सध्याचे नवोदित लेखक जागतिकीकरण आणि एकूणच बदलत्या ग्रामीण वर्तमानाचा वेध कितपत समर्थपणे घेत आहेत असे आपणास वाटते?मला तरी चित्र बरेच आश्वासक वाटते. आसाराम लोमटे, रवी कोरडे, श्रीकांत देशमुख ही काही नावे उदाहरणादाखल घेता येतील. मात्र, समग्र मराठी साहित्याचा विचार केला तर आजचा लेखक भोवतालचा वेध घ्यायला कमीच पडतो, असे चित्र आहे. आमच्या वेळचे जगणे संथ होते. आज वेगवान जगण्याला अनेक गुंतागुंतीचे पदरही आहेत. हे बहुपदरी वास्तव तितक्याशा दमदारपणे उतरत नाही. आपले साहित्यच मुळात वैश्विक नाही. पाश्चात्त्य लेखकांच्या तुलनेत भारतीय लेखकांचा समकालीन वास्तवाचा वेध अपुरा आहे. येत्या काळात आत्मकथन लिहिण्याचा मानस आहे का? अजिबात नाही. मराठीतील बहुतेक सर्वच आत्मचरित्रे ही एकांगी स्वरूपाची आहेत. स्वत:कडे त्रयस्थपणे पाहत तटस्थपणे आत्मपरीक्षण करणे कुठल्याच लेखकाला जमलेले नाही. केवळ स्वत:ला वा स्वत:च्या समाजाला मोठे करायला अनेकांनी आत्मचरित्रे लिहिली. हे असे करणे मला मान्य नाही. अ. भा. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याचा आग्रह आपल्याला आजवर अनेकांनी केला आहे. याबाबत काही...याबाबत माझी भूमिका आधीपासूनच स्पष्ट आहे. या अध्यक्षपदाला तुम्ही सन्मान म्हणत असाल तर त्यासाठी मतांचा जोगवा मागायला का लावता? हे पद प्रत्येकाला महामंडळाकडूनच सन्मानाने दिले जावे या मताचा मी आहे. परिषदा व साहित्य संस्थांचा अध्यक्ष निवडणुका घेऊन निवडला पाहिजे. मात्र, संमेलनाध्यक्षासाठी हे नको वाटते आणि आता तर माझ्या काही विद्यार्थ्यांनीच हे पद भूषवून झाले आहे. त्यामुळे यापुढे सन्मानाने मिळाले तरी माझ्यासाठी त्याचे औचित्य संपले आहे. नुकत्याच मांडलेल्या भाषा धोरणाच्या मसुद्यात महाराष्ट्रात मराठी भाषा सक्तीची करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. याबाबत आपल्याला काय वाटते?महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी आलेच पाहिजे या मताचा मी आहे. मग तो कुठल्याही धर्म, पंथ वा प्रादेशिकतेचा आहे, हा मुद्दा गैरलागू ठरतो. कारण भाषा म्हणजे जगण्याचा धर्म आणि साहजिक अविभाज्य गोष्ट आहे. अर्थात इंग्रजीचा द्वेष वा विरोध न करता मराठीला बळ दिले पाहिजे. कारण आज इंग्रजी ज्ञानभाषा आहे. अर्थात इंग्रजीला महत्त्व देणे म्हणजे इंग्रजी शाळांना अनाठायी प्रतिष्ठा देत मराठी शाळांना गौणत्व देणे नव्हे हेसुद्धा लक्षात घ्यायला हवे. सध्या नवे लिखाण काय सुरू आहे?स्त्रीभ्रूणहत्येच्या समस्येची केवळ चर्चा न करता त्यावर काही उपाय शोधू पाहणारी ‘लेक माझी’ ही कादंबरी नुकतीच पूर्ण केली आहे. याशिवाय खेड्यातली ढासळती कुटुंब व्यवस्था पाहता तिथेही वृद्धाश्रम हवे आहेत, अशी मांडणी करणारी एक कादंबरी सध्या प्राथमिक टप्प्यात आहे. ल्ल शर्मिष्ठा भोसले
आता नव्या हातांना लिहिते करतो आहे!
By admin | Updated: December 25, 2014 00:48 IST