मनेष शेळके , औरंगाबाद विजेचे भारनियमनही ही गंभीर समस्या पाहूून अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या दोन मुलींनी पारंपरिक ऊर्जा स्त्रोतांपासून एक्झॉस्ट फॅनद्वारे वीजनिर्मितीचा प्रकल्प केला आहे. याकरिता हवेवर फिरणारे पाते, बॅटरी व लोहचुंबक या उपकरणांचा वापर करण्यात आला आहे. पूनम बडगुजर व प्रियंका गव्हाणे अशी या मुलींची नावे आहेत. त्या इंटरनॅशनल सेंटर आॅफ एक्सलेन्स इन इंजिनिअरिंग अॅण्ड मॅनेजमेंटमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन शाखेत तृतीय वर्षात शिक्षण घेतात. एक्झॉस्ट फॅन कारखाना, कार्यालय किंवा कीचनमधील गरम हवा बाहेर फेकण्याचे काम करतो. परंतु या व्यतिरिक्त या फॅनचा काही उपयोग होऊ शकतो का, यावर अभ्यास करून त्यांनी हा प्रोजेक्ट करण्याचे काम हाती घेतले. फॅनच्या आतल्या पात्यात ६ मॅग्नेट पोल (चुंबक) वापर करून, मध्यभागी कॉईल बसविण्यात आले. जेव्हा पंखा फिरण्यास सुरुवात होते, तेव्हा चुंबकीय लहरी या कॉईलच्या संपर्कात येऊन, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन नियमानुसार इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स (व्होल्ट) तयार होते. हे व्होल्टेज बॅटरीमध्ये साठवून नंतर इनव्हर्टरचा वापर करून, घरच्या घरी वीजनर्मिती होते. प्रत्येक घरात अल्प खर्चामध्ये हा प्रयोग करणे शक्य आहे. हवेमुळे पाते फिरून वीजनिर्मिती होते. या एका फॅनवर सात व्हॅटचा दिवा अहोरात्र चालू शकतो. या प्रयोगामुळे घरातील बल्ब, टेबल फॅन चालू शकतात. चार ते पाच असे फॅन असले तर संपूर्ण घरात वीज मिळू शकते. याकरिता त्यांना विभागप्रमुख हेमंत जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. आमच्या महाविद्यालयातील मुलींनी अनोखा प्रयोग केला असल्याचे प्राचार्य दिलीप गौर म्हणाले.
आता चक्क एक्झॉस्ट फॅनद्वारे वीजनिर्मिती!
By admin | Updated: June 29, 2016 00:59 IST