औरंगाबाद : पोलिसांच्या अटकेत असलेला कुख्यात गुन्हेगार रईस बोक्याचा दुचाकीचाेर साथीदार क्रांती चौक पोलिसांनी जेरबंद केला आहे. ही कारवाई पाेलिसांनी रविवारी केली. त्याने ७ दुचाकी चोरल्याचे कबूल केले असून, त्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे यांनी दिली.
क्रांती पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक संतोष राऊत हे रविवारी सकाळी ९ वाजता पथकासह एसटी वर्कशॉपजवळ तपासणी करीत होते. एका दुचाकी चालकाचा संशय आल्यामुळे त्यास पथकाने थांबविले. तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यास कागदपत्रे मागितली असता त्याने दिली नाहीत. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, त्याने अतिक शेख लतीफ शेख (२०, रा. आलमगीर कॉलनी, लाईट टॉवरजवळ, साजापूर) असे नाव असल्याचे सांगितले. तसेच मोहम्मद रईस उर्फ बोक्याचा साथीदार असल्याचेही स्पष्ट केले. ही मोटारसायकल छावणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी केल्याचेही त्याने कबूल केले.
त्याला पोलीस ठाण्यात आणून चौकशी केल्यानंतर तो कुख्यात गुन्हेगाराच्या मदतीने दुचाकींची चोरी करीत असल्याचे उघडकीस आले. त्याच्याकडून १ लाख १० हजार रुपये किमतीच्या सहा मोटारसायकली जप्त केल्या आहेत. त्याने दिलेल्या माहितीवरून बुधवारी सकाळी १० वाजता भोईवाड्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ चोरीची मोटारसायकल घेऊन आलेल्या एकास पोलिसांनी सापळा रचून पकडले. त्याच्याकडील दुचाकीही जप्त केली. अशा एकूण सात दुचाकी क्रांती चौक पोलिसांच्या पथकाने जप्त केल्या आहेत. ही कामगिरी पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, निरीक्षक गणपत दराडे, अमोल देवकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अमोल देवकर, पोलीस कर्मचारी नसिम पठाण, मनोज चव्हाण, आजिज खान, संतोष सूर्यवंशी, अमोल मनोरे, देवीदास खेडकर यांच्या पथकाने केली.