उस्मानाबाद : काही पेट्रोलपंप चालक पेट्रोलमध्ये भेसळ करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी शुक्रवार व शनिवारी जिल्ह्यातील पेट्रोलपंपाची पथकांमार्फत तपासणी केली. यात ५० पेट्रोल पंपचालक दोषी आढळल्याने संबधितांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, ८० चालकांना परिपत्रक काढून नागरिकांना तात्काळ सोयी-सुविधा पुरविण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सोमवारी दिले आहेत. जिल्ह्यातील अनेक पेट्रोलपंपावर ग्राहकांची लुबाडणूक होत असल्याच्या तक्रारी मागील काही महिन्यांपासून वाढल्या होत्या. काही ठिकाणी डिझेल व पेट्रोलमध्ये रॉकेलची भेसळ तर काही ठिकाणी डिझेल व पेट्रोल मोजण्याच्या यंत्रातच गडबड असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी होत्या. याच अनुषंगाने ११ व १२ जून रोजी महसूल व पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पेट्रोल पंपावर अचानक धाडी मारल्या. तपासणी पथकांची नियुक्ती करताना जिल्हाधिकाऱ्यांनी संबधित अधिकारी उस्मानाबदचा असेल तर त्याला परंडा तालुक्यातील पेट्रोंल पंपाची तपासणी करण्यास सांगितले होते. त्यामुळे बहुतांश अधिकाऱ्यांनी पट्रोलपंप चालकांची कसून तपासणी करुन त्यात कोणकोणत्या त्रुटी आढळल्या त्याचा रितसर अहवाल जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्याकडे सादर केला होता. या अहवालानुसार प्रामुख्याने दर फलक, साठा फलक , विक्री नोंदवही नसणे, ग्राहकांना पावती न देणे तसेच पावती पुस्तक ठेवलेले नसणे, साठा नोंदवही नसणे, टँकरमधील डिझेल व पेट्रोलचा नमुना न ठेवणे, कामाचे व सुट्टीचे दिवस तसेच वेळ दर्शविणारा फलक नसणे, स्वच्छ व शुध्द पिण्याच्या पाण्याची तसेच स्वच्छतागृहाची व्यवस्था, स्वच्छतागृहाची साफसफाई, दुरवध्वनी व्यवस्था, प्रथमोपचार पेटी आदी त्रुटींचा समावेश आहे. त्यामुळे अशा त्रुटी आढळून आलेल्या ५० पेट्रोलपंप चालकांना जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस बजावली आहे. (प्रतिनिधी) नोटीस मिळाल्यापासून तीन दिवसांत खुलासा सादर नाही केल्यास पंपाचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव संबंधीत तेल कंपनीकडे का पाठविण्यात येऊ नये, तसेच पेट्रोलियम नियमामधील देण्यात आलेले ना हरकत प्रमाणपत्र रद्द का करण्यात येऊ नये, असेही या नोटिसीत नमूद करण्यात आले आहे. नोटीस बजावण्यात आलेल्या पेट्रोलपंप चालकांमध्ये काही राजकीय पुढाकऱ्यांचे पेट्रोल पंप असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, यापुढील काळातही अचानक पेट्रोल पंपाची तपासणी मोहीम सुरूच राहणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सांगितले.