सोमनाथ खताळ , बीडशहरातून जाणाऱ्या बिंदुसरा नदीलगत बिंदुसरा ते मोंढा रोडवरील पुलादरम्यान असणाऱ्या १५२ रहिवाशांना बीड नगर परिषदेच्या वतीने नोटिसा पाठविण्यात आलेल्या आहेत. गतवर्षीच्या तुलनेत पुररेषेत येणाऱ्या लोकांची संख्या कमी होण्याऐवजी ५५ ने वाढली आहे. नोटीसा पाठविलेल्या लोकांनी अद्यापही स्थलांतर केले नाही.शहरातून जाणाऱ्या बिंदुसरा नदीला येणाऱ्या संभाव्य पुरामुळे होणारी जीवित व वित्त हानी याला आळा बसावा, तसेच नदीपात्रालगत ज्या लोकांचे दुकान, व्यवसाय, घर, इतर मालमत्ता आहे अशा लोकांनी सुरक्षीत अशा इतरत्र ठिकाणी स्थलांतरीत व्हावे, अशा प्रकारच्या नोटीसा पुररेषेत येणाऱ्या लोकांना पालीकेने पाठविलेल्या आहेत. मात्र अद्यापतरी एकाही व्यक्तीने स्थलांतर केले नसल्याचे पालीकेतील एका कर्मचाऱ्याने सांगितले. यामुळे पालीकेच्या नोटीसाला पुररेषेत येणाऱ्या १५२ लोकांनी केराची टोपली दाखविली असल्याचे दिसून येत आहे. पुररेषेत येणाऱ्या लोकांनी सुरक्षीत ठिकाणी स्थलांतरीत होण्याऐवजी बिंदुसरा नदीलगतच राहण्यास अधिक पसंती दिली असल्याचे दिसुन येत आहे. गतवर्षी पालीकेकडून ९७ लोकांना नोटीसा पाठविल्याचे स्वच्छता निरीक्षक आर.एस.जोगदंड यांनी सांगितले तर यावर्षी यामध्ये ५५ लोकांची वाढ झाली असून ही संख्या १५२ वर जाऊन पोहचली असल्याचे स्वच्छता निरीक्षक व्ही.टी.तिडके यांनी सांगितले.
पूररषेतील १५२ जणांना नगर पालिकेच्या नोटिसा
By admin | Updated: August 29, 2014 01:29 IST