औरंगाबाद : प्री-पेड मोबाईल ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी म्हणजे आता प्रीपेड सेवेमध्ये ९० दिवसांपेक्षा कमी दिवस सेवेचा वापर नसल्यास कंपनी सेवा बंद करू शकत नाही, अशी माहिती दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राई) चे कर्नाटक, केरळ आणि महाराष्ट्र क्षेत्राचे प्रमुख डॉ. सिबीचेन के. मॅथ्यू यांनी मंगळवारी शहरात घोषणा केली. ट्राईच्या वतीने देशभर ग्राहक जागरुकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. याअंतर्गत मंगळवारी तापडिया नाट्यमंदिरात कार्यक्रम घेण्यात आला. मॅथ्यू पुढे म्हणाले की, फोनसेवेचा वापर न करणाऱ्या ग्राहकांची सेवा बंद करण्याबाबत काही नियम ट्राईने जाहीर केले आहेत. ग्राहकांच्या फोन खात्यात कमीत कमी २ रुपये किंवा त्याहून अधिक जमा असल्यास कंपन्यांना सेवा बंद करता येणार नाही. मोबाईल बंद झाल्यावर पुन्हा सेवा सुरू करण्यासाठी १५ दिवसांचा अधिक कालावधी देण्यात यावा, एखादा नवीन टेरिफ प्लॅन कमीत कमी सहा महिने पुरविणेसुद्धा कंपन्यांना बंधनकारक करण्यात आले असल्याचे त्यांनी नमूद केले. मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी, अनसॉलिसिटेड कमर्शियल कम्युनिकेशन, मूल्याधारित सेवा, तक्रार नोंद कार्यपद्धती, टेरिफ इ.ची माहिती सांगण्यात आली. ग्राहक तक्रार निवारणासाठी ग्राहक संकेत स्थळाचाही वापर करू शकतात. यावेळी बंगळुरूच्या क्षेत्रीय कार्यालयाचे संयुक्त सल्लागार मनीष राघव, वरिष्ठ संशोधन अधिकारी के. मुरलीधर व बीएसएनएलचे प्रधान महाव्यवस्थापक अरविंद वडनेरकर यांची उपस्थिती होती.
३ महिने वापरले नाही, तरीही सुरू राहील प्रीपेड सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2016 00:43 IST