औरंगाबाद : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) प्रवेश घेण्यासाठी अर्जांचा अक्षरश: पाऊस पडला आहे. विभागातील १८ हजार जागांसाठी आतापर्यंत तब्बल ७० हजार विद्यार्थ्यांनी आॅनलाईन अर्ज केले आहेत. अर्ज करण्याची मुदत आणखी तीन दिवस शिल्लक आहे, हे विशेष! मराठवाड्यातील ११८ शासकीय व अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील एकूण १८ हजार जागांसाठी यंदा २७ जूनपासून आॅनलाईन प्रवेशप्रक्रिया सुरू झाली. १० जुलैपर्यंत आॅनलाईन प्रवेश नोंदणीची मुदत आहे. यंदा दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा ‘आयटीआय’कडे कल असल्याचे प्रकर्षाने जाणवते. प्रवेशप्रक्रिया सुरू झाल्यापासून अवघ्या दहा दिवसांमध्ये विभागातील तब्बल ७० हजार विद्यार्थ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे.राज्यात ‘आयटीआय’च्या १ लाख जागांसाठी ३ लाख २५ हजार विद्यार्थ्यांनी आॅनलाईन नोंदणी केल्याचे वृत्त आहे. विद्यार्थ्यांना ११ जुलै रोजी प्रवेशाची नोंदणी झाल्याची खात्री करता येईल. त्यानंतर १२ जुलै रोजी प्रवेशासाठी प्राथमिक गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांच्या काही हरकती असतील, तर त्याच दिवशी (१२ जुलै रोजी) संबंधित ‘आयटीआय’मध्ये दाखल करता येतील. १४ जुलैपासून प्रवेश फेरी सुरू होईल.
पॉलिटेक्निक नको; आयटीआयच बरे
By admin | Updated: July 7, 2016 23:55 IST