लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप करीत भाजपच्या संचालकांनी जाधववाडीतील कृउबा समितीचे सभापती संजय औताडे यांच्यावर पुन्हा एकदा अविश्वास प्रस्ताव आणण्याची मागणी आज जिल्हाधिकाºयांकडे केली. यामुळे येत्या काळात कृउबातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.भाजपच्या नाकावर टिच्चून काँग्रेसचे संजय औताडे ५ आॅगस्ट २०१५ रोजी जाधववाडीतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदावर विराजमान झाले होते. तेव्हापासून काँग्रेस व भाजपमध्ये एकामेकांवर कुरघोडी करण्याचे राजकारण आजमितीपर्यंत सुरू आहे. औताडे कोणालाही विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेतात. त्यांनी मनमानी कारभार सुरू केला आहे. संचालकांना अरेरावीची भाषा वापरण्याचा त्यांच्यावर ठपका ठेवून ११ महिन्यांनंतर पुन्हा एकदा भाजपच्या संचालकांनी सभापतींवर अविश्वास प्रस्ताव आणला आहे. यासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात उपसभापती भागचंद ठोंबरे यांनी निवेदन दिले.यावेळी नगरसेवक राजू शिंदे यांची उपस्थिती होती. निवेदनावर १३ जणांचे नाव होते. मात्र, प्रत्यक्षात १२ जणांनीच सह्या केल्या होत्या. काँग्रेसला पाठिंबा देणारे तीन संचालक फुटल्याचा दावा यावेळी करण्यात आला.यानंतर उपसभापतींनी उपनिबंधक कार्यालय (सहकार) येथेही अविश्वास प्रस्ताव आणावा यासाठी निवेदनाची एक प्रत दिली. यामुळे आता पुन्हा बाजार समितीमधील राजकीय वातावरण तापू लागले आहे. मागील वेळेस अविश्वास ठराव बारगळला होता; पण आता संजय औताडे यांना सभापतीपदावरून खाली खेचण्यासाठी भाजपाने पुन्हा एकदा शड्डू ठोकला आहे.मागील ठराव बारगळला हभाजपच्या संचालकांनी ३ आॅक्टोबर २०१६ रोजी सभापती संजय औताडे यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणला होता; पण त्यावेळी १० संचालकांची उपस्थिती आवश्यक असताना केवळ ९ संचालकच हजर राहिले. गणपूर्तीअभावी अविश्वासाची सभा तहकूब करण्यात आली.
सभापतींवर अविश्वास प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 00:23 IST