उस्मानाबाद : जिल्हा बँक निवडणूक रणधुमाळी सुरु झाली असून, बुधवारी वैध व अवैध नामनिर्देशनपत्राची यादी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून जाहीर करण्यात आली आहे. विद्यमान अध्यक्ष बापूराव पाटील, उपाध्यक्ष संजय देशमुख आणि संचालक सुनिल चव्हाण यांना दिलासा मिळाला असून, या तिघांचेही अर्ज वैध ठरले आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या आखाड्यात आणखी २३४ अर्ज राहिले आहेत. २९ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत.उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मागील काही वर्षापासून आर्थिक संकटाचा सामना करीत आहे. याच बँकेच्या तिजोरीच्या चाव्या आपल्याकडे घेण्यासाठी सर्वच पक्षांनी जोर लावला आहे. त्यामुळेच १५ जागेसाठी थोडे थोडके नव्हे तब्बल २४७ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी छाननीदरम्यान १३ अर्ज बाद ठरले होते. तर विद्यमान चेअरमन बापूराव पाटील यांच्या अर्जावर हर्षवर्धन चालुक्य, व्हा. चेअरमन संजय देशमुख यांच्या उमेदवारीबाबत राष्ट्रवादीचे सतीश दंडनाईक आणि विद्यमान संचालक सुनिल चव्हाण यांच्या अर्जावर तामलवाडीतील बलभीम लोंढे यांनी आक्षेप नोंदविला होता. या आक्षेपावर सुनावणीही घेण्यात आली होती. तर अंतिम निकाल बुधवारी जाहीर करण्यात येईल, असे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले होते. त्यानुसार अंतिम निकाल आणि पात्र, अपात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. उपरोक्त तिन्ही विद्यमान पदाधिकाऱ्यांचे उमेदवारी अर्ज वैध ठरल्याने त्यांना एक प्रकारचा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज मागे घेण्यास बुधवारपासून सुरुवात झाली आहे. यासाठी २९ एप्रिलपर्यंत मुदत असणार आहे. (प्रतिनिधी)
अध्यक्ष-उपाध्यक्षासह संचालकाचे नामनिर्देशन वैध
By admin | Updated: April 16, 2015 00:58 IST