वडवणी : येथील नगरपंचायतीत नगराध्यक्षा मंगल राजाभाऊ मुंडे यांच्यावर दाखल केलेला अविश्वास ठराव सोमवारी बारगळला. त्यामुळे नगराध्यक्षपदी मंगल मुंडे यांच्या बाजूने ८ तर विरोधात ७ मते पडली. त्यामुळे मुंडे यांचे नगराध्यक्षपद शाबूत राहिले. राष्ट्रवादीचे सत्ताबदलाचे मनसुबे उधळल्याने भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला.वर्षभरापूर्वी वडवणी ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीत झाले होते. १७ सदस्यांच्या या न.पं. मध्ये पहिल्या नगराध्यक्षा होण्याचा मान मंगल मुंडे यांना मिळाला. दरम्यान, चौदाव्या वित्त आयोगाचा १ कोटी ७० लाखाचा निधी नुकताच प्राप्त झाला असून त्यातून शहरात मूलभूत विकासकामे सुरु आहेत. विकासकामांत विश्वासात घेतले जात नसल्याने नाराज असलेल्या भाजपच्या काही नगरसेवकांना राष्ट्रवादीने गळाला लावले होते. त्यानंतर नगराध्यक्षा मंगल मुंडेंविरुद्ध अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता. सोमवारी नगरपंचायत कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी उपविभागीय अधिकारी महेंद्र कांबळे, तहसीलदार सतीश थेटे, मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड यांच्या उपस्थितीत दुपारी बारा वाजता बैठकीला सुरुवात झाली. सहलीवर गेलेले भाजपचे ५, राष्ट्रवादी व अपक्ष आघाडी ७ व शिवसेनेचे एक नगरसेवक सभास्थळी ऐनवेळी पोहोचले. यावेळी नगराध्यक्षा मंगल मुंडे यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे गटनेते शेषेराव जगताप, संभाजी शिंदे, अनिता जमाले, शफीयाबी अन्सार कुरेशी, गयाबाई आळणे, अपक्ष संजय उजगरे, लतिका उजगरे या नगरसेवकांनी मतदान केले. तर मंगल मुंडे यांच्या बाजूने भाजपच्या कमल पवार, सोनाली बडे, मेहताबी अब्दूल रौफ पठाण, वर्षा वारे, शिवाजी टकले, विनय नहार, प्रेमदास राठोड यांनी मतदान केले.शिवाय मंगल मुंडे यांचे स्वत:चे एक मत भाजपच्या पारड्यात पडले. त्यामुळे ८ विरुद्ध ७ अशा फरकाने मंगल मुंडे या नगराध्यक्षपदी कायम राहिल्या. हात उंचावून मतदान करण्यात आले.शिवसेनेचे नगरसेवक कचरू जाधव यांनी तटस्थ राहणे पसंत केले तर भाजपच्या फुटीर नगरसेविका यशोदा राठोड आजारी असल्याचे कळवून गैरहजर राहिल्या. (वार्ताहर)
अविश्वास ठराव बारगळला
By admin | Updated: February 28, 2017 00:59 IST