लातूर : महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी अख्तर मिस्त्री यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून प्रभाग समित्या व विविध विषय समितीच्या सभापतींची मंगळवारी निवड करण्यात आली़ पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी डॉ़ विपीन शर्मा यांनी काम पाहिले़ स्थायी समितीच्या सभापती निवडीसाठी मंगळवारी सकाळी १० वाजता स्थायीच्या सदस्यांची बैठक बोलाविण्यात आली होती़ काँग्रेसचे बहुमत असलेल्या मनपात स्थायी समिती सभापतीपदासाठी काँग्रेसचे हाजी अख्तर मिस्त्री यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली़ दोन वर्षांचा कार्यकाल पूर्ण झाल्याने रिक्त झालेल्या ८ जागांवर नवीन सदस्यांनी १९ मे रोजी झालेल्या विशेष सभेत निवड करण्यात आली होती़ त्यात कॉंग्रेसचे ६, राष्ट्रवादी १ व शिवसेनेच्या एका सदस्याचा समावेश होता़ नव्याने घेण्यात आलेल्या सदस्यातूनच एकाची सभापतीसाठी वर्णी लागणार असल्याची चर्चा होती़ सभापती अख्तर मिस्त्री यांनी तत्कालीन नगरपालिकेत पाणी पुरवठा सभापती म्हणून चांगले काम केले होते़ पालिकेत त्यांची ही दुसरी टर्म आहे़ गेल्या आठ दिवसांपासून विषय समितीच्या सभापती वर्णी लावण्यासाठी काँग्रेस पक्षातील नगरसेवकांमध्ये चुरस लागली होती़ इच्छुकांनी नेत्यांकडे आपलीच वर्णी लागावी म्हणून प्रयत्न चालविला होता़ स्थायी समितीच्या सभापती निवडीसाठी सकाळी १० वाजता सदस्यांची बैठक आयोजिण्यात आली होती़ इतर समित्यांसाठी ११़ ४० ची वेळ देण्यात आली होती़ त्यानुसार काही सदस्य ११ वाजण्याच्या सुमारास मनपा सभागृहात आले़ मात्र, तत्पुर्वी सभापतीसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने विषय समिती व प्रभाग समित्यांच्या सभापतींची निवड बिनविरोध जाहिर करण्यात आली ़ दिलेल्या वेळेत आलेल्या काही सत्ताधारी नगरसेवक व विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी निवडी अगोदरच जाहिर झाल्याने नाराजी व्यक्त केली़ यावेळी महापौर स्मिता खानापुरे, उपमहापौर सुरेश पवार, आयुक्त सुधाकर तेलंग आदींची उपस्थिती होती़ काँग्रेसचे गटनेते नरेंद्र अग्रवाल, शहराध्यक्ष अॅड. समद पटेल आदी नगरसेवक उपस्थित होते. बांधकाम व दिवाबत्ती सभापतीपदी गिरीष पाटील, पाणीपुरवठा, स्वच्छता व पर्यावरण समितीच्या सभापती-अॅड़ दिपक सूळ, शिक्षण, क्रीडा, युवक कल्याण, उद्यान, मनोरंजन व सांस्कृतिक कार्य समितीच्या सभापतीपदी पूजा पंचाक्षरी, आरोग्य, वैद्यकीय सहाय्य, गृहनिर्माण, गलिच्छवस्ती सुधार समितीच्या सभापतीपदी पंडित कावळे, महिला बालकल्याण व समाजकल्याण समितीच्या सभापतीपदी रेणुका कडणे व उपसभापतीपदी शमाबी आक्रम मोमीन यांची निवड करण्यात आली आहे़ विषय समिती सभापती निवडीसाठीही प्रत्येकी एक अर्ज आल्याने बिनविरोध निवड केली. आरोग्य सभापती म्हणून निवड झालेले पंडित कावळे हे मनपात नवखे आहेत़ काही महिन्यांपूर्वी प्रभाग ३० मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत कावळे यांना निवडून आणण्यासाठी शैलेश लाहोटी यांचा मोलाचा वाटा होता़ लाहोटी हे भाजपात जाणार असल्याची चर्चा शहरात असताना त्यांच्या समर्थकास सभापतीपद देऊन काँग्रेसने नवीन डाव टाकला आहे़ (प्रतिनिधी) लातूर महानगरपालिका कार्यक्षेत्रात चार झोन पाडण्यात आले असून समितीचे गठण १९ मेच्या विशेष सभेत करण्यात आले होते़ प्रत्येक प्रभाग समितीत ९ प्रभागातील १८ सदस्यांचा समावेश आहे़ मंगळवारी ए झोन सभापतीपदी सुधाकर साळुंके, बी झोन सभापतीपदी राजकुमार जाधव, सी झोन खैरून्निसा अहेमदखाँ पठाण, डी झोनच्या सभापतीपदी विक्रांत गोजमगुंडे यांची निवड करण्यात आली आहे़
मनपा सभापती बिनविरोध
By admin | Updated: May 28, 2014 00:23 IST