जालना: नगर परिषद वाहन चालक व कर्मचारी संघटनने पुकारलेल्या कामबंद आंदोलनामुळे दुसऱ्या दिवशी (गुरूवारी) पालिकेत शुकशुकाट होता. सर्वच विभाग बंद होते. तळ मजल्यावरील बांधकाम विभाग वगळता सर्वच विभागांची दारे बंद होती. तर पहिल्या मजल्यावरील रेकॉर्ड विभाग व विवाह नोंदणी विभाग सुरू होता. एकूणच कामबंद आंदोलनामुळे पालिकेचे कामकाज ठप्प आहे. बुधवारपासून कर्मचाऱ्यांनी सहा प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन पुकारले आहे. गुरूवारी हा संप सुरूच होता. मागण्यांबाबत ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. नगर परिषदेकडून मागण्यांबाबत कोणताच सहानूभुतीपूर्वक विचार होत नसल्याने कर्मचाऱ्यांवर हा अन्याय असल्याचे संघटनेने म्हटले आहे. १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व १६ एप्रिल रोजी मांगीरबाबा यात्रा आहे. त्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांची आर्थिक अडचण होऊ नये म्हणून मागण्या तात्काळ मान्य करून कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन व उपोषण सोडविण्याची मागणी संघटनेने केली आहे. दरम्यान, संघटनेने गुरूवारी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, शहरात कोठेही अस्वच्छतेचा प्रश्न निर्माण झालेला नाही. अत्यावश्यक सेवा देण्याच्या कामामध्ये हेच कर्मचारी अग्रेसर असल्याचे संघटनेचे अध्यक्ष राजराम गायकवाड, महासचिव सुरेंद्र ठाकूर, कोषाध्यक्ष अ.कादर अ. रहिम यांनी सांगितले. पालिकेने कर्मचाऱ्यांना वेठीस धरू नये असेही प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
दुसऱ्या दिवशीही संप सुरूच
By admin | Updated: April 6, 2017 23:40 IST