जालना : सरस्वती प्रिटिंग प्रेस ते माहेश्वरी भवन दरम्यानच्या नव्या रस्त्याची चाळण सुरु होत आहे. अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतंर्गत या रस्त्याचे डांबरीकरण झालेले आहे. ‘लोकमत’ने मंगळवारी दुपारी या रस्त्याचा आॅन द स्पॉट पंचनामा केला. हे काम अत्यंत निकृष्ट झाल्याचे परिसरातील रहिवाशांनी सांगितले. थोडक्यात सहा महिन्यांपूर्वीच झालेला रस्ता चार ते पाच वर्षांपूर्वी झाला की काय? असे रस्त्याकडे पाहिल्यावर दिसून येते. मुळातच रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याने रस्ता तयार केल्यावर काहीच दिवसांत खड्डे पडण्याचे तसेच डांबर निघून जात आहे. अनेक दिवसांनंतर रस्त्याचे भाग्य उजळणार असल्याने वाहनचालक व रहिवाशांतून समाधान व्यक्त होत होते. मात्र झाले उलटेच. थातूरमातूर कामामुळे रस्त्याची दुर्दशा झाली आहे. रस्त्याचे काम दर्जाहीन होत असल्याचे तसेच हे काम नव्याने करण्यात यावे, अशी मागणी परिसरातील व्यापारी तसेच रहिवाशांनी पालिकेकडे केलेली आहे. सुरुवातच मोठ्या खड्ड्यांनी होते. गायत्री भवन समोरील रस्त्याचेही डांबर उघडे पडलेले आहे. हा रस्ता नवीन आहे की नाही, असा सवाल नागरिक उपस्थित करतात. सदर बाजार पोलीस ठाण्यासमोरील रस्त्याची अवस्थाही वाईटच म्हणावी लागेल. नवीन रस्ता किमान दोन ते चार वर्षे टिकेल अशी माफक अपेक्षा नागरिकांना आहे. पालिकेतील सूत्रांनी सांगितले की, संबंधित कंपनीचे देयके थांबविण्यात आली आहेत.त्यांना लेखी कळविण्यात आले आहे. पावसाळ्यानंतर काम केले जाईल असे सांगण्यात आले होते. मात्र हे काम अद्याप सुरु झाले नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. (वार्ताहर)
सहा महिन्यांत नवीन रस्ता झाला जुना
By admin | Updated: February 4, 2015 00:39 IST