जालना : कायद्यापुढे प्रत्येक जण समान आहे. पत्रकारांनी जात, पात, धर्म, पंथ, पक्ष या गोष्टींपासून दूर राहून निरपेक्षपणे लिखाण करावे. लिखाणामध्ये वस्तुनिष्ठता असणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातील वृत्तपत्र व जनसंवाद विभागातील प्रा.डॉ. वि.ल. धारूरकर यांनी केले.जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा वकिल संघ जालना यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा न्यायालयातील वैकल्पिक वाद निवारण केंद्र येथे आयोजित ‘वृत्तपत्र कायदा’ या विषयावर आयोजित शिबिरात उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या शिबिराच्या अध्यक्षस्थानी जिल्हा सरकारी अभियोक्ता मुकुंद कोल्हे तर प्रमुख पाहुणे म्हणून तदर्थ जिल्हा न्यायाधीश वर्ग १ निरंजन रा. नाईकवाडे, जिल्हा माहिती अधिकारी एस.के. बावस्कर, जिल्हा वकिल संघाचे अध्यक्ष एस.ए. तारेक, जिल्हा वकिल संघाचे उपाध्यक्ष महेश धन्नावत, सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक कैलास लोया यांची उपस्थिती होती.पुढे बोलताना धारूरकर म्हणाले की, बातमीचे लिखाण करताना संपादक किंवा प्रतिनिधींनी आचारसंहिता अंगीकारली पाहिजे. तसेच पत्रकारिता सरळपणे करत बातमीमध्ये वस्तुनिष्ठता जपली पाहिजे. माहितीच्या अधिकारामुळे पत्रकारांना सामर्थ्य लाभले असले तरी यामुळे पत्रकारांच्या जबाबदारीमध्ये मोठी वाढ झाली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी धारूरकर यांनी वृत्तपत्र नोंदणीचा कायदा, श्रमिक पत्रकार कायदा, बदनामीचा कायदा, न्यायालयाचा अवमान, कॉपीराईट कायदा या विषयावर उपस्थित पत्रकांराना सखोल मार्गदर्शन करण्याबरोबरच पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिले. यावेळी बोलताना न्यायाधीश नाईकवाडे म्हणाले की, पत्रकारांनी वस्तुनिष्ठ आणि परिस्थितीला अनुसरून बातमीचे लिखाण करावे. तसेच पत्रकारांसाठी असलेले कायदे व नियमांचे सखोल ज्ञान होण्यासाठी आयोजित केलेली शिबिरे हे नक्कीच पत्रकारांना उपयुक्त ठरणार असल्याचे सांगून पत्रकारांसाठी असलेले कायद्याचे सखोल मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा सरकारी अभियोक्ता मुकुंद कोल्हे यांनी अध्यक्षीय समारोप केला. सामाजिक कार्यकर्ते कैलास लोया यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. शिबिरास अॅड. अर्शद बागवान, अॅड. गणेश देशमुख यांच्यासह वृत्तपत्राचे संपादक, प्रतिनिधी, इलेक्ट्रॉनिक मिडियाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
वस्तुनिष्ठ लिखाणाची आवश्यकता - धारूरकर
By admin | Updated: May 27, 2015 00:38 IST