लोकसंवाद फाऊंडेशनतर्फे २५ एप्रिल रोजी आयोजित संवादमालेत डॉ. साळुंखे यांनी ‘न्याय्य व सर्वसमावेशक शिक्षणाचे चिंतन’ याविषयी भाष्य केले. फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. राजेश करपे अध्यक्षस्थानी होते.
डॉ. साळुंखे म्हणाले की, कोरोनामुळे आता विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये शिक्षण मिळत नाही. तंत्रज्ञानाच्या अपुऱ्या साधनांमुळे ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणात अनेक अडचणी येत आहेत. यामुळे आता विषमता अधिक प्रमाणात वाढत आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर खासगीकरण होत आहे. त्यामुळे गरीब विद्यार्थ्यांनाही उत्तम शिक्षण मिळावे, यासाठी विशेष धोरण ठरवावे, असेही त्यांनी नमूद केले.
शिक्षणाच्या बाजारीकरणाला शक्य तेवढ्या मार्गांनी विरोध करणार आहोत, असे डॉ. करपे यांनी अध्यक्षीय मनोगतात सांगितले. भाषा अभ्यासक डॉ. सतीश बडवे, डॉ. रत्नदीप देशमुख, डॉ. गणेश मोहिते, प्रा. भारत शिरसाट, डॉ. बापू शिंगटे, प्रशांत नरके, डॉ. गणेश बडे यांच्यासह माजी कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे, तंत्रशिक्षण सहसंचालक डॉ. महेश शिवणकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
संकेत कुलकर्णी यांनी संचालन केले. प्रा. फेरोज सय्यद यांनी आभार मानले. निखिल भालेराव यांनी तांत्रिक साहाय्य केले.