उस्मानाबाद : ५५ सदस्य संख्या असलेल्या जिल्हा परिषदेत कोणत्याही पक्षाला बहुमतापर्यंत मजल मारता आलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसला दोन तर सेना-काँग्रेसला चार जागांची कमतरता आहे. त्यामुळे भाजपा किंगमेकरच्या भूमिकेत आहे. अशा परिस्थितीत दगाफटका होण्याची शक्यता गशहित धरुन खबरदारीचा भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या सर्व सदस्यांना सहलीवर पाठविले आहे. हे सदस्य आता थेट अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडी दिवशीच उस्मानाबादेत परतणार आहेत.जिल्हा परिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये ५५ पैकी तब्बल २६ जागा जिंकत राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. परंतु, बहुमतासाठीचा २८ हा जादुई आकडा गाठता आला नाही. तर दुसरीकडे गत निवडणुकीमध्ये नंबर एकचा पक्ष म्हणून समोर आलेल्या काँग्रेसची सदस्यसंख्या सातने घटली. तर सेनेच्याही तीन जागा कमी झाल्या. केंद्र आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपालाही चारपेक्षा अधिक जागा पटकाविता आल्या नाहीत. त्यामुळे अध्यक्ष-उपाध्यक्ष कोणत्या पक्षाचे होणार? याची उत्सुकता ताणली गेली आहे. सत्तेच्या खुर्चिवर बसण्यासाठी राष्ट्रवादीला दोन सदस्यांची कमतरता आहे. तर काँग्रेस आणि सेनेला चार सदस्य कमी पडत आहेत. मागील पाच वर्षात काँग्रेस-सेना आणि भाजपाने एकत्रितपणे संसार केला. परंतु, किंगमेकरच्या भूमिकेत असलेल्या भाजपाने यावेळी ‘आमच्यासमोर सर्व पर्याय खुले आहेत’, असे सांगितल्याने हे तीन पक्ष सत्तेसाठी एकत्र येणार की नाही, याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. भाजपाने आपल्यासोबत यावे, यासाठी राष्ट्रवादीसह काँग्रेस-सेनेकडूनही प्रयत्न सुरू केले आहेत. असे असले तरी भाजप कोणाला सत्तेच्या खुर्चिवर बसविणार? हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे खबरदारीचा भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने आपले सर्व २६ सदस्य सोमवारी दुपारी सहलीवर धाडले. या सदस्यांवर ‘वॉच’ ठेवण्यासाठी श्रेष्ठीकडून विश्वासातील व्यक्तींना सोबत पाठविण्यात आले आहे. या सर्व सदस्यांना पश्चिम महाराष्ट्रातील एका शहरामध्ये ठेवण्यात आले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.