कळंब : शहराला सध्या चोराखळी तलावातून टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असून, हे पाणी महिन्यातून दोन वेळा मिळत आहे. पालिकेकडे वारंवार सुरळीत पाणीपुरवठ्याची मागणी करूनही याकडे दुर्लक्ष होत असल्याच्या आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोमवारी पालिका प्रशासनाचा निषेध नोंदविण्यासाठी व सुरळीत पाणीपुरवठ्याच्या मागणीसाठी पालिकेवर मोर्चा काढण्यात आला. यात महिलांची संख्याही लक्षणीय होती.शहरातील सावरकर चौकातून निघालेला हा मोर्चा बँक रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी चौकमार्गे पालिकेवर जावून धडकला. यावेळी मोर्चेकऱ्यांनी पालिकेच्या कारभाराविरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. यावेळी नगरसेवक संजय मुंदडा यांनी शहराला टँकरद्वारे मिळणारे पाणी व शहराला पुरवठा होणारे पाणी याचे सविस्तर गणितच मांडले. शहराला पुरेसे पाणी मिळते, तर मग ते जाते कुठे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. श्रीधर भवर, प्रकाश भडंगे, विलास करंजकर, मुस्तान मिर्झा यांची भाषणे झाली. या मोर्चासाठी नगरसेवक संजय मुंदडा, माजी नगराध्यक्ष किरण हौसलमल, शहराध्यक्ष सागर मुंडे, सलिम मिर्झा, राजाभाऊ मुंडे, बाळासाहेब कथले, दत्तात्रय तनपुरे, शंकर खंडागळे, नागनाथ घुले, सलिम शेख, महेश पुरी, तारीक मिर्झा, प्रशांत लोमटे, शकील काझी, अमर गायकवाड, गीता पुरी, मिनाक्षी हजारे, भैय्या खंडागळे, किरण पानढवळे आदींनी पुढाकार घेतला. (वार्ताहर)
कळंब पालिकेवर राष्ट्रवादीचा मोर्चा
By admin | Updated: May 31, 2016 00:28 IST