औरंगाबाद : राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी तुटल्यानंतर आता आगामी महापालिकेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे लढण्याची शक्यता आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आ. सतीश चव्हाण यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आघाडी तुटल्यामुळे वेगवेगळा संसार थाटला होता. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या एप्रिल २०१५ मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी स्वतंत्रपणे मैदानात उतरण्याचा निर्णय होऊ शकतो, असे ते म्हणाले.काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र लढल्यास त्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला होऊन पक्षाच्या जागा वाढतात, असा २०१० मधील मनपा निवडणुकीचा अनुभव आहे.यातूनच आगामी महापालिकेच्या निवडणुकीत स्वतंत्रपणे उतरण्याबाबत निर्णय होऊ शकतो, असे आ. चव्हाण म्हणाले. या निर्णयाबाबत मी बोलत असलो तरी पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर चर्चा होऊनच अंतिम निर्णय होऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. मनपातील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अफसर खान यांनी विधानसभा निवडणूक समाजवादी पार्टीच्या तिकिटावर लढल्यामुळे त्यांचे नगरसेवकपद पक्षांतर बंदी या कायद्यानुसार रद्द होऊ शकते. मनपा गटनेतेपद पुढे रिक्त राहिले तरी फरक पडणार नाही, असे ते म्हणाले. समांतर पाणीपुरवठा योजना नागरिकांच्या हिताची नाही.
मनपा निवडणुकीत राष्ट्रवादी स्वतंत्र लढणार
By admin | Updated: October 17, 2014 23:57 IST