बीड : शह- काटशहाच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसने शत्रूपक्षांशी केलेल्या हातमिळवणीनंतरही ११ पैकी ७ ठिकाणी सभापीतपद पटकावून राष्ट्रवादी काँग्रेस क्रमांक १ चा पक्ष ठरला आहे. बीडमध्ये आ. जयदत्त क्षीरसागर यांनी पुतणे संदीप क्षीरसागर यांना जोरदार हादरा देत पराभवाची कसर भरुन काढली. गेवराईत दोन पंडितांनी मिळून आ. लक्ष्मण पवार यांना दणका दिला. पहिल्याच प्रयत्नात आ. विनायक मेटे यांच्या शिवसंग्रामने सभापतीपद खेचून आणत आश्चर्याचा धक्का दिला. भाजपने केज, पाटोद्याचा गड सर केला तर गेवराईत जोरादार मुसंडी मारुन शिवसेनेने खाते उघडले.बीडमध्ये वाजली ‘शिट्टी’!बीड : सर्वाधिक ६ सदस्य व एका अपक्षाच्या मदतीमुळे ‘वजनदार’ वाटणाऱ्या संदीप क्षीरसागर यांच्या काकू- नाना विकास आघाडीला सत्तेपासून दूर ठेवण्यात अखेर आ. जयदत्त क्षीरसागरांना यश आले. शिवसंग्राम- शिवसेनेने एकत्रित येत स्थापन केलेल्या तालुका विकास आघाडीने भाजप एक व राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांसह सत्ता मिळवली. सभापतीपद आपल्याकडे खेचून शिवसंग्रामने विजयाची शिट्टी वाजवली तर उपसभापतीपद राखून शिवसेनेच्या धनुष्यानेही आपला रुबाब दाखवला.१६ सदस्यांच्या बीड पं. स. मध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. त्यामुळे सत्ता कोणाकडे जाते? याची शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठा होती. काकू- नाना आघाडी ६, शिवसंग्राम व शिवसेना प्रत्येकी ३, भाजप व अपक्ष प्रत्येकी १ व राष्ट्रवादी २ असे पक्षीय बलाबल होते. अपक्ष मीनाक्षी झुळूक यांनी पाठिंबा दिल्याने काकू- नाना आघाडी बलाढ्य झाली होती. मात्र, तत्पूर्वी शिवसेना-शिवसंग्रामने एकत्रित येऊन तालुका विकास आघाडी या नावाने स्वतंत्र गटाची नोंदणी केली होती. मंगळवारी सकाळपासूनच राजकीय खलबते सुरु होती. राष्ट्रवादीच्या दोन व भाजपच्या एका सदस्याने तालुका विकास आघाडीच्या मागे उभे राहणे पसंद केले. सकाळी ११ वाजेपासूनच बीड पं. स. आवारात कडेकोट बंदोबस्त तैनात होता. दुपारी दोन वाजता बैठकीला प्रारंभ झाला. सभापतीपद ओबीसी महिलेसाठी आरक्षित होते. त्यासाठी तालुका विकास आघाडीतर्फे शिवसंग्रामच्या मनीषा ज्ञानेश्वर कोकाटे तर काकू- नाना विकास आघाडीकडून मयुरी प्रल्हाद देवकते यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले. उपसभापतीपदासाठी शिवसेनेच्या मकरंद उबाळे तर काकू- नाना आघाडीच्या मीनाक्षी झुळूक यांचा अर्ज आला. कोकाटे व उबाळे यांना अनुक्रमे ९ तर देवकते - झुळूक यांना ७ मते मिळाली. शिवसेनेच्या मकरंद उबाळे, मनीषा खांडे, तुळजाबाई नवले, शिवसंग्रामचे बबन माने, मनीषा कोकाटे, स्वाती वायसे, राष्ट्रवादीच्या किशोर सुरवसे, नीता झोडगे व भाजपच्या रामकंवर शिंदे यांनी तालुका विकास आघाडीच्या बाजून मतदान केले. त्यामुळे कोकाटे, उबाळे यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला. हात उंचावून मतदान झाले. प्रवेशद्वारावर कार्यकर्ते व पोलिसांत किरकोळ बाचाबाची झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी काम पाहिले. तहसीलदार छाया पवार, गटविकास अधिकारी डॉ. ज्ञानोबा मोकाटे यांनी सहायक म्हणून भूमिका बजावली. सभापतीपदी राणी बेदरे, उपसभापतीपदी प्रकाश बडेशिरुर : आठ सदस्यांच्या येथील पं.स. मध्ये राष्ट्रवादीचे चार, भाजपचे तीन व काकू- नाना विकास आघाडीचा एक असे बलाबल होते. सभापतीपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव होते. राकाँडून सभापतीपदासाठी राणी बेदरे तर उपसभापतीपदाकरिता उषा सरवदे यांचे अर्ज आले. भाजपकडून सभापतीपदाकरिता प्रकाश खेडकर व उपसभापतीपदासाठी अॅड. प्रकाश बडे यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले. राष्ट्रवादीच्या बेदरे यांना चार तर भाजपच्या खेडकर यांना चार मते मिळाली. उपसभापतीपदाकरिता उषा सरवदे यांनी माघार घेतल्याने अॅड. बडे यांच्या अविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. दोन्ही पक्षांच्या समर्थकांत समाधान व्यक्त करुन जल्लोष केला. दोन सदस्य गैरहजर८ सदस्यांपैकी भाजपचे अॅड. प्रकाश बडे व काकू- नाना आघाडीच्या मंगल सानप यांनी मतदान प्रकियेत सहभाग घेतला नाही. मंगल सानप तटस्थ राहिल्या. अर्ज दाखल करुन अनुपस्थित राहिलेल्या बडे यांच्या पदरात उपसभापतीपद पडले.परळीत सोळंके, मुंडे यांची वर्णीपरळी : येथील पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीच्या कल्पना सोळंके व उपसभापतीपदी बालाजी मुंडे यांची निवड झाली. चार मतांच्या फरकाने दोघांनीही भाजपच्या सदस्यांना चित करुन विजय संपादन केला. १२ पैकी ७ जागा राकॉने पटकावल्या होत्या. एका जागेवर माकपचा उमेदवार विजयी झाला होता तर भाजपकडे ४ सदस्य होते. सर्वसाधारण महिलेसाठी सभापतीपद राखीव होते. पं. स. सभागृहात पार पडलेल्या बैठकीत सभापतीपदासाठी सोळंके यांना ८ तर भाजपच्या रेणुका फड यांना ४ मते मिळाली. उपसभापतीपदासाठी बालाजी मुंडे यांना ८ तर भाजपच्या मोहन आर्चाय यांना ४ मते पडली. पीठासीन अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांनी काम पाहिले. तहसीलदार विद्याचरण कडवकर, गटविकास अधिकारी संजय केंद्रे यांनी त्यांना सहाय्य केले. निवनियुक्त सभापती, उपासभापतींचा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सत्कार केला. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत फटाके फोडून आंनदोत्सव साजरा केला. यावेळी जि.प. सदस्य अजय मुंडे, माजी नगराध्यक्ष वाल्मिक कराड, माजी पं. स. सभापती अॅड. गोविंद फड, अॅड. अजय बुरांडे, आयुब पठाण, माणिक फड, राजाभाऊ निर्मळ, विजय भोयटे, संजय फड, संतोष शिंदे आदी उपस्थित होते.आष्टी पंचायत समितीकडे राकाँकडेआष्टी : येथील पंचायत समितीत राष्ट्रवादी व भाजपकडे प्रत्येक ७ असे तुल्यबळ सदस्य असल्याने चिठ्ठीद्वारे निवडी होतील असे अपेक्षित होते. मात्र, सभापतीपदाच्या निवडीवेळी भाजपच्या आशा गर्जे तटस्थ राहिल्याने राष्ट्रवादीच्या उर्मिला पाटील यांची सात मतांसह निवड झाली. भाजपच्या मेघना झांजे यांना केवळ सहा मते मिळाली. उपसभापतीपदाकरिता भाजपकडून आजिनाथ सानप व राष्ट्रवादीतर्फे रमेश तांदळे यांचा अर्ज होता. समान सात मते मिळाल्याने चिठ्ठी टाकून निवड करण्यात आली. यामध्ये भाजपचे आदिनाथ सानप नशीबवान ठरले.