उस्मानाबाद : जिल्हा परिषदेतील (झेडपी) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच्या सर्व म्हणजेच १९ सदस्य गुरूवारी रात्री सहलीवर गेले आहेत. तत्पूर्वी माजी राज्यमंत्री राणाजगजितसिंह पाटील यांनी सर्व सदस्यांची बैठक घेवून त्यांची मते जाणून घेतली आहेत. जिल्हा परिषदेत मागील अडीच वर्ष काँग्रेस-शिवसेनेची सत्ता होती. परंतु, सध्या विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने सेनेसोबत रहायचे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोबत घेवून सत्ता हातात घ्यायची, या मनस्थितीमध्ये काँग्रेस अडकली आहे. जिल्हा परिषदेतील ही युती तोडावी तर विधानसभेला एकमेकांची रसद कशी मिळणार आणि सोबत रहावे तर निवडणूकीत सेनेबरोबरची मैत्री अडचणीची ठरणार. या सर्व प्रकारामुळे स्थानिक काँग्रेसचा एक गट राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्यास इच्छुक आहे. तर पूर्वीचेच समिकरण कायम ठेवण्याबाबत दुसरा गट आग्रही आहे. त्यामुळे याबाबत चर्चा करण्यासाठी मुरूम येथे दोन दिवसांपूर्वी काँग्रेस सदस्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी अध्यक्ष-उपाध्यक्ष पदासाठी पालकमंत्री मधुकरराव चव्हाण आणि आ. बसवराज पाटील हे जी नावे पुढे करतील त्यांना साथ देण्याचे ठरले आहे. त्यामुळे ही नेतेमंडळी कोणाच्या पारड्यात झुकते माप टाकते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, अद्याप सत्तेची समिकरणे कशा पद्धतीने जुळून येणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. वेळप्रसंगी राष्ट्रवादी, काँग्रेस आणि सेना-भाजप यांच्यामध्ये तिरंगी लढतही होवू शकते. ही शक्यता लक्षात घेवून माजी राज्यमंत्री राणाजगजितसिंह पाटील यांनी गुरूवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास उस्मानाबाद येथे तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीला सर्व १९ सदस्य उपस्थित होते. यावेळी त्यांनी सर्व सदस्यांची मते जाणून घेतली आहेत. निवडीवेळी कुठल्याही प्रकारचा दगाफटका होवू नये, यासाठी सर्व सदस्यांना सहलीवर पाठविण्याचा निर्णय झाला. त्यानुसार हे सदस्य गुरूवारी रात्री सहलीवर रवाना झाले आहेत. (प्रतिनिधी)जिल्हा परिषदेत सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे १९ तर काँग्रेसकडे वीस सदस्य आहेत. यामध्ये काँग्रेसच्या एका गटाकडे नऊ सदस्य आहेत. हे सर्व सदस्य त्यांच्या नेत्याचा शब्द प्रमाण मानतात. त्यामुळे काँग्रेसचा हा गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे १९ असे २८ सदस्य एकत्र आणून त्या बळावर जिल्हा परिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादी अशी सत्ता स्थापन होणार असल्याची चर्चाही गुरुवारी जिल्हा परिषद वर्तुळात सुरू झाली आहे. असे झाल्यास शिवसेनाधार्जीना असलेल्या काँग्रेसमधील दुसऱ्या गटाला मोठा धक्का बसू शकतो.
‘झेडपी’तील राष्ट्रवादी काँग्रेस सदस्य सहलीवर
By admin | Updated: September 19, 2014 01:00 IST