जालना : जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदाच्या दोन जागांसाठी रविवारी मतदान झाले. यात इतर सहकारी (ग्राहक) संस्था मतदार संघातून मनीषा उढाण तर नागरी सहकारी बँक मतदार संघातून सिद्धीविनायक मुळे विजयी झाले. १५ संचालक यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. संचालक मंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचा वरचष्मा राहिल्याने अध्यक्षदेखील याच पक्षाचा होईल, अशी चिन्हे आहेत. सहाय्यक निबंधक कार्यालयात सकाळी आठ वाजता मतदानाला सुरूवात झाली. पाच सव्वा पाच वाजता निकाल जाहीर करण्यात आला. यात इतर सहकारी मतदार संघातून मनीषा उढाण यांना ६५ तर विष्णू कंटुले यांना २३ मते मिळाली. नागरी सहकारी बँक मतदार संघातून सिद्धीविनायक मुळे यांना ६४ तर रितेश कामड यांना एक मत मिळाले. एक मत बाद झाले. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंंडळाच्या १७ जागा आहेत. त्यापैकी १५ बिनविरोध निवडून आले आहेत. दोन जागांसाठी मतदान घेण्यात आले. ही निवडणूक प्रक्रिया सहाय्यक निबंधक जनार्दन गुट्टे, सहाय्यक निबंधक विष्णू रोडगे, क्षेत्रीय अधिकारी महेश जयरंगे, प्रदीप मघाडे यांनी पार पडली. एकूणच १५ जागा बिनविरोध झाल्या तरी दोन जागासांठी चांगलीच चुरस निर्माण झाली होती. त्यामुळे दोन जागांसाठी मतदान घेण्यात आले. मतदानावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
जिल्हा बँकेवर ‘एनसीपी’चे वर्चस्व!
By admin | Updated: April 2, 2017 23:51 IST