व्ही़एस़ कुलकर्णी उदगीरउदगीर तालुक्यात सन २००९ साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीपासून राष्ट्रवादी काँग्रेसची पिछेहाट सुरु झाली आहे़ नुकत्याच झालेल्या उदगीर नगर परिषदेच्या निवडणुकीत तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चौथ्या क्रमांकावर राहिला़ सन २००४ साली उदगीर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चंद्रशेखर भोसले (५७६०५ मते) विजयी झाले होते़ त्यांनी भाजपाचे गोविंदराव केंद्रे (५४४८८ मते) यांचा पराभव केला होता़ सन २००६ साली झालेल्या उदगीर नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने १५ जागा जिंकल्या होत्या़ मात्र, इतक्या जागा जिंकूनही पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्ता स्थापन करता आली नव्हती़ सन २००७ साली झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत जि़ प़ चे तीन गट व पं़ स़ चे आठ गण पक्षाच्या ताब्यात राहिले़ यावेळी झालेल्या निवडणुकीत सर्वाधिक २४०१० मते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना मिळाली होती तर दुसऱ्या क्रमांकाची १५७७३ मते भाजपाच्या उमेदवारांना मिळाली होती़ सन २००९ साली झालेल्या उदगीर विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाचे सुधाकर भालेराव (७३८४० मते) विजयी झाले़ राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मच्छिंद्र कामत (५६५६३ मते) हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले़ सन २०११ साली झालेल्या उदगीर नगर पालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ सहा जागा मिळाल्या होत्या़ सन २०१२ साली झालेल्या जि़ प़ व पं़ स़ च्या निवडणुकीत गट व गणातुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकही जागा मिळाली नव्हती़ या निवडणुकीत काँग्रेस पहिल्या तर भाजपा दुसऱ्या क्रमांकावर राहिला़ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मताधिक्य तिसऱ्या क्रमांकावर होते़ सन २०१४ साली झालेल्या उदगीर विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाचे सुधाकर भालेराव (६६६८६ मते) विजयी झाले त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय बनसोडे (४१७९२ मते) यांचा पराभव केला़ नुकत्याच झालेल्या उदगीर नगर पालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपदाचे उमेदवार व प्रभागातील उमेदवारांच्या अनामत रकमाही जप्त झाल्या आहेत़ पक्षाचा अध्यक्षपदाचा उमेदवार शेख समीरोद्दीन (१९४२ मते) चौथ्या क्रमांकावर राहिला़ शिवाय प्रभागातील तीन उमेदवार वगळता सर्व उमेदवार चौथ्या ते पाचव्या क्रमांकावर राहिले़
उदगीर तालुक्यात राष्ट्रवादीची पिछेहाट़़़
By admin | Updated: January 3, 2017 23:21 IST