जालना : राष्ट्रीय पेयजल योजनेच्या ८४ कामांचे सन २०१४-१५ या आर्थिक वर्षासाठी उद्दिष्ट असून त्यापैकी २५ कामे सुरू असून एक योजना पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील सूत्रांनी दिली. जिल्ह्यात एकूण ९७१ गावे आहेत. मात्र अनेक ठिकाणी आजही कायमस्वरूपी पाणीपुरवठा नाही. किंवा काही ठिकाणी कालबाह्य झालेल्या योजना आहेत. त्यामुळे तेथे ग्रामस्थांना पिण्याचे पाणी मिळण्यास अडचण निर्माण होते. मात्र केंद्र सरकारच्या सुरूवातीची भारत निर्माण तर आता राष्ट्रीय पेयजल या नावाने राबविण्यात येत असलेल्या योजनेमुळे अनेक गावांमधील पिण्याचा कायमस्वरूपी प्रश्न मिटविण्यास हातभार लागलेला आहे. या योजनेअंतर्गत २५५ गावांमध्ये कामे राबविण्यात येणार आहेत. त्यासाठी एकूण १४१ कोटी २७ लाख ५ हजारांचा खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी ८४ कामे यावर्षी राबविण्यात येणार असून त्यासाठी ३३.७३ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. एप्रिलमध्ये २६ योजनांची कामे सुरू झाली होती. त्यापैकी एक काम पूर्ण असून अन्य प्रगतीपथावर असल्याचे सांगण्यात आले. या कामांमध्ये अंबड तालुक्यात ११, घनसावंगी ५, जालना २२, बदनापूर ७, परतूर ६, जाफराबाद ८, भोकरदन १४ तर मंठा तालुक्यात ११ कामांचा समावेश आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत पेयजल योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. (प्रतिनिधी) टप्प्याटप्प्याने पूर्ण करणार उद्दिष्ट गतवर्षी भीषण दुष्काळाच्या काळात या योजनेअंतर्गत ८३ गावांमध्ये पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाल्या होत्या. यंदा टप्प्याटप्प्याने मार्च २०१५ पर्यंत उद्दिष्ट पूर्ण करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. याबाबत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस.एम. कदम म्हणाले की, गेल्यावर्षी दुष्काळाच्या काळात टंचाई निवारणासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबविण्यात येत असताना जिल्ह्यात पेयजल योजनेची ८३ कामे झाली. हे सांघिक प्रयत्नांमुळेच होऊ शकले. यावर्षीही दिलेले उद्दिष्ट पार होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
८४ गावांत राबविणार राष्ट्रीय पेयजल योजना
By admin | Updated: May 7, 2014 00:22 IST