लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : राखी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या भावाच्या हातावर राखी बांधून संकटकाळी मदतीला धावून येण्याचे आवाहन प्रत्येक बहीण आपल्या भावाला करीत असते. लोकमत सखी मंचच्या सदस्यांनी रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या लाखो बहिणी आणि त्यांचे कुटुंबिय सुरक्षित राहावे म्हणून आपल्या कुटुंबापासून कोसो मैल दूर राहून आपले राष्ट्रकर्तव्य निभावणाºया सातारा परिसरातील भारत बटालियन येथील सैनिकांना राखी बांधली आणि राष्ट्रबंधन निभावले.सातारा परिसरात भारत बटालियन हे राखीव पोलीस दलाचे मोठे केंद्र आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी शेकडो सैनिक येथे अहोरात्र सज्ज असतात. चोवीस तास देशसेवेचे व्रत घेतलेल्या या सैनिकांना सणासुदीलाही आपल्या घरापासून दूर राहावे लागते. या सैनिकांना राखी बांधून त्यांनाही रक्षाबंधनाचा आनंद लुटता यावा, यासाठी लोकमत सखी मंचच्या वतीने राष्ट्रबंधन या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत हजारो सखींनी आणि विद्यार्थ्यांनी स्वत:च्या हाताने राख्या तयार करून सैनिकांसाठी पाठविल्या होत्या.सखी मंचच्या विभाग प्रतिनिधी नूतन अडसरे, मीनाक्षी केसकर, माधुरी जोशी, रत्नमाला भुसावळकर, दीपिका अजमेरा, संगीता हळदे आदींनी सैनिकांच्या हातावर राख्या बांधल्या. या बहिणींसह संपूर्ण भारतवासीयांचेच रक्षण करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे वचन सैनिक भावांनी सखींना दिले. याप्रसंगी भारत बटालियनचे समादेशक सुरेश माटे, सहायक समादेशक शेख इलियास, सहायक समादेशक गोविंद निजलेवार, पोलीस निरीक्षक निझाम. एस. पठाण, पोलीस निरीक्षक राजेंद्र. ए. राऊत आदींची विशेष उपस्थिती होती.
सखींनी निभावले असेही ‘राष्ट्रबंधन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 00:46 IST