नंदागौळ : परळी तालुक्यातील नंदागौळ येथे गुरुवारी सकाळी ११ वा. गूढ आवाज ऐकू आल्याने नागरिक भयभीत झाले. हा आवाज कशाचा होता? या प्रश्नाची उकल ग्रामस्थांना होऊ शकली नाही.नंदागौळ परिसरात गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास मोठा आवाज ऐकू आला. त्यामुळे अख्खे गाव भूकंप झाल्यासारखे हादरुन गेले. या आवाजामुळे गावातील महिला, लहान मुले, वयोवृद्ध ग्रामस्थ भयभीत झाले होते. हा आवाज नेमका कशाचा होता? हे कोणालाच कळू शकले नाही. आवाज झाल्यानंतर भूकंपच झाला की काय? अशी शंका अनेकांना आली तर परिसरात कुठेतरी स्फोट झाला असावा, असा अंदाज काहींनी व्यक्त केले. गूढ आवाजानंतर तालुका परिसरात या विषयावर बराच वेळ चर्चा झाली. ग्रामस्थांनी एकमेकांना विचारपूस करुन हा आवाज कोठून व कसा आला? याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचे मूळ कारण कोणालाही ठोसपणे सांगता आले नाही. नंदागौळसह १० कि.मी. परिसरापर्यंतच्या लोकांनी हा आवाज ऐकला असल्याचे समोर आले आहे. या संदर्भात बोलताना ग्रामसेवक कालीदास होळंबे म्हणाले, ग्रामस्थांशी चर्चा करुन याबाबतची माहिती ग्रामपंचायत कार्यालयाला दिली आहे व त्यांच्यामार्फत ही माहिती प्रशासनाला कळविण्यात आली आहे. (वार्ताहर)
गूढ आवाजाने नंदागौळ हादरले !
By admin | Updated: August 22, 2014 01:00 IST