साबेर खान , जालनापवित्र रमजान ईद गुरूवारी साजरी होत आहे. ईद उत्साहात व धडाक्यात साजरी करण्यासाठी जालना बाजारपेठेत बुधवारी सकाळपासून मोठी गर्दी झाली होती. या खरेदीतील उत्साहामुळे बाजारात तेजी आल्याचे चित्र आहे. तयार कपडे, मिठाई, सौंदर्य प्रसाधने खरेदीसाठी झुंबड उडाली होती. एकूणच रमजान ईदमुळे बाजारात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे. केवळ कपडा बाजारात जवळपास दहा कोटींची उलाढाल झाल्याची माहिती व्यावसायिकांनी दिली आहे. मुस्लिम धर्मियांच्या पवित्र उपवासाची सांगता रमजान ईदने होते. ही ईद साजरी करण्यासाठी धर्मातील सर्वस्तरातील नागरिक नवीन कपडे, मिठाई आवर्जुन खरेदी करतात. गत आठवडाभरापासून बाजारात गर्दी वाढत आहे. ईदनिमित्त शिरखुर्माच्या साहित्य तसेच सुकामेव्याची प्रचंड मागणी वाढली आहे. पेंड खजूर तसेच इतर साहित्य साहित्य आखाती देशातून आल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. पेंडखजूरचे दहा पेक्षा अधिक प्रकार उपलब्ध आहेत. ५० रूपयांपासून एक हजार रूपये प्रति किलोपर्यंत पेंडखजूर विक्रीसाठी आल्या आहेत. त्यात मधुमेहींसाठी वेगळी पेंडखजूर उपलब्ध आहेत. याबरोबरच काजू, बदाम, पिस्ता, खोबरे, खारीक, किसमिस साहित्याची मागणी वाढली आहे. काजू प्रति पावकिलो २५० ते ३०० प्रति किलोचा भाव आहे. खोबरे २०० रूपये किलो, खारीक ३०० रूपये प्रति किलो मिळत आहे. मागणी वाढत असल्याने आवकही वाढत असल्याचे फुल बाजारातील व्यापाऱ्यांनी सांगितले. रेडिमेड कपड्यांनाही प्रचंड मागणी वाढत आहे. यात प्रामुख्याने विविध चित्रपट तसेच कलाकारांच्या आवडीचे पोशाख विक्री होत आहेत. साड्या, पंजाबी ड्रेस, पठाणी ड्रेस सोबतच पँट व शर्टची खरेदीसाठी कापड दुकानांमध्ये रात्री उशिरापर्यंत खरेदीसाठी गर्दी होती. युवक-युवतींमधून बॅ्रंडेड कपड्यांची मागणी वाढत असल्याचे व्यापारी विजय मोटवाणी यांनी सांगितले. यात देशीसोबतच काही विदेशी ब्रँडची युवा वर्गाकडून मागणी आहे. कपड्यांसोबतच अत्तरचीही खरेदी वाढली आहे. यात पारंपरिक अत्तरासोबतच नवीन तयार अत्तरलाही मागणी आहे. यात पारंपरिक अत्तरची मागणी जास्त असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. विविध वस्तूंच्या खरेदीतून बाजारपेठेत कोट्यवधी रूपयांची उलाढाल होत आहे. यात प्रामुख्याने कापड बाजाराने यात आघाडी घेतली असून, कपडे खरेदीसाठी रात्री उशिरापर्यंत दुकाने उघडी राहत आहेत. रमजान ईदनिमित्त कपडा बाजारात महिनाभरात सुमारे दहा कोटींची उलाढाल झाल्याची माहिती व्यापारी सुधीर सचदेव यांनी दिली. ईदच्या दोन ते तीन दिवस अगोदर बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी दिसून आली. रेडीमेड कपड्यांना चांगली मागणी आहे. ४यात प्रामुख्याने फूल वर्क, रेशमी वर्क साडी, बॉर्डर पॅटर्न, कुंदन साडी, फॅन्सी साडी, घागरा साडी, पंजाबी सुट, बाजीराव मस्तानी पॅटर्न,शरारा पॅटर्नला प्रचंड मागणी असल्याचे सांगण्यात आले. महिलांसोबत पुरूषांच्या कपड्यातही वेगवेगळे पॅटर्न उपलब्ध आहेत. ईदगाह कदीम जालना- सकाळी १० वाजताईदगाह गांधीनगर- सकाळी १० वाजताईदगाह सदर बाजार- सकाळी १०.३० वाजतादर्गा राजाबाग शेर सवार- सकाळी १०.१५ वाजतामिया साहब दर्गा- सकाळी १० वाजतागुलजार मशीद (मंगळबाजार) - ९.३० वाजताजामा मशीद (जुना जालना) - १०.१५ वाजतामदीना मशीद( जुना जालना)- सकाळी ९ वाजतामोठ्यांसोबतच बच्चे कंपनीतही रमजान ईदचा उत्साह दिसून आला.बाजारात गर्दी वाढली असून,यामध्ये मुलांचे प्रमाण लक्षणीय होते. बच्चे कपंनी कपडे, नवीन बूट, टोपी, रूमाल आदी साहित्य खरेदी करण्यात मग्न होती.
नमाजाचे वेळापत्रक ईदनिमित्त बाजार फुलला!
By admin | Updated: July 6, 2016 23:51 IST