लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : तालुक्यातील भिवपूर येथील दादाराव सुखदेव खंडागळे (४०) याचा मृतदेह मंगळवारी येथे शहरालगतच्या एका विहिरीत आढळून आला. दरम्यान, मृताच्या पत्नीने भोकरदन पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दोन संशयितांना खुनाच्या गुन्ह्यात ताब्यात घेतले आहे.मृत दादाराव खंडागळे हे ऊसतोड कामगार आहेत. आठ जुलैला ते गावातील गणेश पांडुरंग जाधव व वसंत विठोबा वाघ यांच्यासोबत दुचाकीने बोरगाव कासारी (ता़ सिल्लोड ) येथील अनिल छगन कांबळे यांच्याकडे ऊसतोडीसाठी उचल घेण्यास गेले होते. कांबळे घरी नसल्यामुळे त्यांच्या पत्नीने पतीशी फोनवर संपर्क केला. दादाराव यांना दारूचे व्यसन असल्याने कांबळे यांनी पैसे देण्यास नकार दिला. आम्ही तिघे गाडीवर आलो असून, पेट्रोल टाकण्यासाठी पैसे नाहीत, असे दादाराव यांनी सांगितल्यामुळे त्यांना पाचशे रुपये देण्याचे कांबळे यांनी पत्नीस सांगितले. रात्री गणेश पांडुरग जाधव व वसंत विठोबा वाघ हे दोघे दुचाकीवरून घरी आले. दादाराव यांच्या मुलाने माझे वडील का आले नाहीत, अशी विचारणा केली. दारुच्या नशेत असलेल्या दोघांनी तो मेल्याचे सांगितले. सकाळी दादाराव यांची पत्नी मिना यांनी गावचे सरपंच व ग्रामस्थांना घेऊन जाधव व वाघ याचे घर गाठले. आम्ही दारूच्या नशेत बोललो, दादाराव बोरगाव रांजणी गावात थांबला होता, असे त्या दोघांनी ग्रामस्थांना सांगितले. दरम्यान, मंगळवारी सकाळी भोकरदन शहरालगतच्या माधुसिंंग डोभाळ यांच्या विहिरीत दादाराव खंडागळे यांचा मृतदेह आढळून आला. उपविभागीय पोलिस अधिकारी ईश्वर वसावे, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, आऱ एस़ सिरसाठ यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह बाहेर काढला. या प्रकरणी मिनाबाई यांच्या फिर्यादीवरून गणेश पांडुरग जाधव व वसंत विठोबा वाघ यांच्याविरूध्द खून व जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऊसतोड कामगाराचा खून, दोन संशयित ताब्यात
By admin | Updated: July 12, 2017 00:38 IST