औरंगाबाद : स्थायी समिती सभापतींच्या पत्रानंतर आता मनपा प्रशासनही शहर बससेवा सुरू करण्यासाठी सरसावले आहे. मनपाची शहर बससेवा सुरू करण्याच्या दृष्टीने खाजगी व्यक्तींकडून प्रस्ताव मागविण्याची तयारी प्रशासनाकडून करण्यात येत असल्याचे पालिकेतील विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. दरम्यान, शहर बससेवेच्या प्रक्रियेला वेग आणण्यासाठी येत्या आठवड्यात पालिकेतील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची बैठकही होणार आहे. शहरात सध्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची शहर बससेवा सुरू आहे. मात्र, परिवहन महामंडळाकडून मोजक्याच बस रस्त्यावर उतरविण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे शहरवासीयांना सक्षम बससेवा मिळत नसल्याची परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर मनपातील स्थायी समिती सभापती दिलीप थोरात यांनी आठवडाभरापूर्वीच आयुक्तांना याबाबत पत्र दिले आहे. मनपाने ही सेवा पुन्हा स्वत:च्या ताब्यात घेण्यासाठी कार्यवाही सुरू करावी, असे यात म्हटले आहे. त्यानंतर आता प्रशासनानेही या दृष्टीने कार्यवाही सुरू केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. विशेष म्हणजे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनीही काही महिन्यांपूर्वीच मनपाने शहर बससेवा पुन्हा सुरू करावी, अशी सूचना केली होती. त्यामुळे आता मनपा प्रशासनही पूर्ण क्षमतेने कामाला लागले आहे. याआधीही मनपाने २००६ ते २०१० या काळात खाजगी ठेकेदाराच्या माध्यमातून शहर बससेवा चालविलेली आहे. आताही खाजगी ठेकेदाराच्या माध्यमातून ही सेवा चालविण्याचा पालिकेतील अधिकारी, पदाधिकाऱ्यांचा विचार आहे. हे करताना मागील वेळच्या चुका मात्र टाळण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचेही सूत्रांनी सांगितले. खाजगी ठेकेदारांकडून शहर बससेवा चालविण्यासंदर्भात लवकरच प्रस्ताव मागविले जाणार आहेत. त्यासाठीही तयारी प्रशासनाकडून केली जात आहे.
शहर बस चालविण्यासाठी मनपा प्रशासन सरसावले
By admin | Updated: November 14, 2015 00:54 IST