वाळूज महानगर : मुंबई- नागपूर हायवे हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनत चालला असून, या महामार्गावर अपघात सत्र सुरूच आहे. नादुरुस्त टेम्पोवर दुचाकी आदळल्यामुळे १९ वर्षीय दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन मरण पावल्याची घटना आज सकाळी या महामार्गावरील खोजेवाडीजवळ घडली.अनिल उत्तमराव घोडेराव (१९, रा. दत्तावाडी, ता. वैजापूर) हा तरुण आज ११ जुलै रोजी दुचाकी क्रमांक एमएच-२०, सीए-६४७९ वर स्वार होऊन गावाकडून वाळूज औद्योगिक क्षेत्रात रोजगार शोधण्यासाठी येत होता. खोजेवाडीजवळ सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास अनिल घोडेराव यांची दुचाकी रस्त्यावर नादुरुस्त उभा असलेल्या टेम्पो क्रमांक एमएच-०४, बीओ-७८५ वर जाऊन धडकली. या अपघातात अनिल हा गंभीर जखमी झाल्यामुळे त्यास एमआयडीसी वाळूज पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्यास मयत घोषित केले.या प्रकरणी सहायक फौजदार भालचंद्र पवार यांच्या तक्रारीवरून आरोपी टेम्पोचालक संताराम विठ्ठल पाटील (रा. जळगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोहेकॉ. आर.के. कुंटेवाड पुढील तपास करीत आहेत.अपघात सत्र सुरूच मुंबई-नागपूर या महामार्गावर ए.एस. क्लब ते लासूरपर्यंत अपघात सत्र सुरूच असल्यामुळे वाहनधारक व नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या महामार्गावरून भरधाव वेगाने वाहने धावत असल्यामुळे तसेच वाहतूक शाखेचे कर्मचारी फिरकत नसल्यामुळे अपघाताचे सत्र सुरूच आहे. या मार्गावर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांची नेमणूक करून वाहतुकीला शिस्त लावण्याची मागणी होत आहे.
मुंबई-नागपूर हायवे बनतोय मृत्यूचा सापळा
By admin | Updated: July 12, 2014 00:55 IST