प्रताप नलावडे ल, बीडजिल्ह्यातील सहाही मतदारसंघात आता चौरंगी लढती रंगणार असल्याचे शनिवारी स्पष्ट झाले आहे. विधानसभेच्या सहा जागांसाठी १७८ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले असून सर्वच प्रमुख पक्षांना मतविभाजनाचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नेहमीच एकास एक अशी तुल्यबळ लढत पाहणाऱ्या जिल्ह्यातील मतदारांना यावेळी चौरंगी लढत पाहण्यास मिळणार आहे. आघाडी आणि महायुतीचे शकले उडाल्याने नव्या चेहऱ्यांना मात्र निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची संधी आयतीच चालून आली आहे.बीड जिल्ह्यातील बीडसह माजलगाव, परळी, केज,गेवराई आणि आष्टी या मतदारसंघात सर्वच उमेदवारांची राजकीय कोंडी होणार असल्याचेही दिसू लागले आहे. परळी मतदारसंघातील लढत लक्षवेधी ठरणार आहे. भाजपाच्या आमदार पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे या भावाबहिणीच्या लढतीत काँग्रेसकडून प्रा. टी. पी. मुंडे यांनीही मुसंडी मारली आहे. त्यामुळे परळीत तिरंगी सामना होणार आहे. बीड मतदारसंघात पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीकडून आपली उमेदवारी दाखल केली असून त्यांना या मतदारसंघात चौरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. क्षीरसागर यांना शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्यासह शिवसेनेचे अनिल जगताप आणि मनसेचे प्रा.सुनील धांडे यांच्याशी सामना करावा लागणार आहे. विनायक मेटे यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. बीड मतदारसंघातील लढत ही प्रतिष्ठेची होणार हे निश्चित झाले आहे. माजलगाव मतदारसंघात भाजपाने आर.टी. देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघातून राष्ट्रवादीतून नुकतेच भाजपात गेलेले रमेश आडसकर यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा होती. परंतु भाजपाने आडसकर यांना उमेदवारी दिलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही उमेदवार बदलाची मागणी होत राहिली परंतु राष्ट्रवादीनेही आपला उमेदवार न बदलता पुन्हा एकदा विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांना उमेदवारी दिली आहे. गेवराईत चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले असून राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार बदामराव पंडित यांना भाजपाचे लक्ष्मण पवार, शिवसेनेचे अजय दाभाडे, काँगेसचे सुरेश हत्ते आणि मनसेचे राजेंद्र मोटे यांच्याशी सामना करावा लागणार आहे. आष्टीत राष्ट्रवादीचे सुरेश धस, भाजपाचे भीमराव धोंडे, मनसेचे वैभव काकडे आणि काँग्रेसचे मिनाक्षी पांडुळे असा चौरंगी सामना रंगणार आहे़निवडणुकीपूर्वी कामाला लागलेले आणि पक्षाची उमेदवारी आपल्यालाच मिळणार हे गृहित धरलेल्या काहीजणांचा पत्ता ऐनवेळी कट झाला असल्याने सर्वच पक्षात नाराजांची संख्या वाढली आहे. त्यामुळे प्रचारात ही मंडळी कोणता ‘करीष्मा’ दाखविणार याचीही चर्चा सध्या राजकीय वर्तुळातून होऊ लागली आहे. ४केज मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने विद्यमान आमदार पृथ्वीराज साठे यांना डावलले आहे. सुरूवातीपासून त्यांचे नाव चर्चेत होते. परंतु त्यांना उमेदवारी न देता राष्ट्रवादीच्या दिवंगत नेत्या विमल मुंदडा यांच्या स्रुषा नमिता मुंदडा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सुरूवातीपासून अक्षय मुंदडा यांनी आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नसल्याचे सांगत ऐनवेळी केलेली ‘एंट्री’ अनेकांना धक्का देणारी ठरली आहे. याच मतदारसंघात भाजपाचे तिकिट आपल्यालाच मिळणार असे सांगत दोन महिन्यापासून प्रचाराला लागलेल्या डॉ. अंजली घाडगे यांचाही पत्ता भाजपाने कट केला. परंतु त्यांनी काँग्रेसची उमेदवारी मिळवून निवडणुकीचे मैदान गाठले आहे. बाबुराव पोटभरे हे मुंडे कुटुंबियांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांना केजमधून भाजपाचे तिकिट मिळणार असा अंदाज व्यक्त होत असताना त्यांनाही पक्षाने डावलले आहे. रिपाइंचे पप्पु कागदे यांचे तिकिट निश्चित मानले जात असतानाच त्यांनाही डावल्याने समिकरणे कशी बदलतात हे पुढच्या काही दिवसात स्पष्ट होईल. ४माजलगाव मतदारसंघात नुकतेच भाजपात आलेले रमेश आडसकर यांचे नाव आज उमेदवारी भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत सर्वात पुढे होते. परंतु त्यांना पक्षाकडून डावलण्यात आले असून आर.टी. देशमुख यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे. भाई थावरे यांचेही नाव चर्चेत असताना पक्षाने त्यांनाही ठेंगा दाखविला आहे. याच मतदारसंघातून आपल्याला उमेदवारी मिळणार असे गृहित धरून प्रचाराला लागलेल्या मनसेच्या रेखा फड यांचा पत्ता ऐनवेळी कट झाला आहे. ४गेवराईत विजयसिंह पंडित यांचे नाव राष्ट्रवादीकडून चर्चेत होते. त्यांना जि.प. चे अध्यक्षपद देऊन बदामराव पंडित यांना पक्षाने सेफ केले आहे. काँग्रेसकडून उमेदवारी मिळेल, असे अपेक्षित धरुन कामाला लागलेल्या संजय काळे यांनाही पक्षाने ब्रेक लावला आहे. ४बीडमधून काँग्रेसने अशोक हंगे, दिलीप भोसले आणि बाळासाहेब जटाळ यांचा पत्ता कट केला आहे. शिवसेनेने उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांना डावलले आहे. आष्टीत भाजपाकडून बाळासाहेब आजबे आणि माजी आमदार साहेबराव दरेकर यांना डावलण्यात आले आहे. आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश धस व भाजपचे भीमराव धोंडे यांच्यात थेट लढत होत आहे़ या आखाड्यात ११० वर्षाच्या पहेलवानाने उडी घेतली आहे़ दादासाहेब थोरवे असे या उमेदवाराचे नाव आहे़ ते स्वातंत्र्यसैनिक असून त्यांनी अनेक निवडणुका पाहिल्या आहेत़ मी रझाकाराशी लढलो, ही तर साधी विधानसभा निवडणूक आहे, अशा शब्दात त्यांनी मातब्बरांना इशारा दिला आहे़
बहुरंगी लढती !
By admin | Updated: September 28, 2014 00:22 IST