हिंगोली : जिल्ह्यात रेशीम उत्पादनाचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत असून, १३२ एकरमध्ये १३४ शेतकरी रेशीमचे उत्पादन घेत आहेत. आतापर्यंत ५२ हजार १६५ अंडीपुंजचे वाटप शेतकऱ्यांना रेशीम कार्यालयातून केल्याची नोंद आहे. सुरुवातीच्या काळात जम्मू काश्मीर व पश्चिम बंगालमध्ये रेशीमची शेती फुलविली जात होती. आता महाराष्ट्रात रेशीम शेतीला उपयोगी हवामान असल्याने येथील शेतकरीही रेशीम शेतीकडे वळले आहेत. त्यातच हिंगोली जिल्ह्यातही रेशीम शेतीचे जाळे पसरले असून, शेतकरी लाखो रुपये उत्पन्न घेत आहेत. इतर पिकाच्या तुलनेत रेशीम शेतीमध्ये जोखीम कमी असून उत्पन्न मोठ्या प्रमाणात आहे. आज घडीला १३४ शेतकरी १३२ एकरवर रेशीमचे पीक घेत आहेत. त्यांना सन २०१४- १५ मध्ये ६५ हजार ५०० अंडीपुंजांचे संगोपन करुन ३० टन कोषाचे उत्पादन काढले. यात ७८ लाख रुपये उत्पन्न जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाले आहे. तर सन २०१५- १६ मध्ये वातावरण तुती लागवडीसाठी अनुकूल नसताना ८८ एकरवर तुतीची लावगड झालेली आहे. जुन्या आणि नवीन तुती लागवडीवर नोव्हेंबर २०१५ अखेर ५४ हजार अंडीपुंजाच्या वापरातून २५ टन कोषाचे उत्पादन घेवून त्यापासून ५४ लाख ५७ हजार २३१ रुपयाचे उत्पन्न कोष विक्रीतून प्राप्त झाले आहे. इतर पारंपरिक पिकांसारखी पाच ते सहा महिने उत्पादनाची प्रतीक्षा करण्याची गरज नाही. आजमितीला रेशीमचे उत्पन्न महिन्याकाठी ३० ते ४० हजारांचे होत असल्याने, शेतकऱ्यावर अडचणीचा सामना करण्याची वेळ येत नाही. आजपावेतो ५४९ शेतकरी अळीसंगोपन करीत असून ५० शेतकरी पिके घेत आहेत.
१३२ एकरमध्ये तुतीची लागवड
By admin | Updated: December 20, 2015 00:07 IST