मुदखेड : येथील पंचायत समितीच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी खरीप हंगामाची तयारी केली असून शेतकऱ्यांचे शोषण करणाऱ्या खत, बियाणे कृत्रिम टंचाईसह जादा दराने विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी पथके नेमणूक करण्यात आल्याची माहित कृषी अधिकारी श्यामसुंदर रातोळीकर यांनी दिली़पंचायत समिती मुदखेड, कृषी विभाग, राज्य शासन कृषी विभाग व महसूल प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने खरीप हंगामाची मोठी जय्यत तयारी केली असून विविध प्रकारचे कार्यक्रम आखणी करण्यात येवून व्यापाऱ्यांना कडक सूचनाही देण्यात आल्या आहेत़ मुदखेड तालुक्यातील ३४ कृषी केंद्रावर ४० कृषी सहाय्यक यांच्या नियुक्त्या करून एक फिरते पथकही नियुक्त करण्यात आले़ कृषी सेवा केंद्र चालक व्यापाऱ्यांनी ठरवून दिलेल्या किंमतीपेक्षा जास्त दराने व साठवणूक करून कृत्रिम तुटवडा करू नये असे करताना आढळून आल्यास अथवा शेतकऱ्यांची तक्रार आल्यास त्या कृषी केंद्राचा परवाना निलंबित करून केंद्रात असलेला माल जप्त करण्यात येईल व चालकावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे निर्देशही व्यापाऱ्यांना कृषी विभागाकडून देण्यात आले आहेत़खरीप हंगाम २०१३ मध्ये सोयाबीन पीक काढणीच्या वेळेस पाऊस झाला होता, त्यामुळे सध्या काही सोयाबीन चांगल्या प्रतीचे राहिले नाही, त्यासाठी कृषी विभागाने तालुक्यातील गावोगाव जावून ग्रामसभा आयोजित केल्या असून या सभांमध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे़ या उपक्रमाद्वारे तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, विस्तार अधिकारी, पर्यवेक्षक यांनी घरचे बियाणे वापरावेत, असे आवाहन केले़ (वार्ताहर)
मुदखेडचा कृषी विभाग खरिपाच्या तयारीत
By admin | Updated: June 20, 2014 00:15 IST