छत्रपती संभाजीनगर येथील माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयाने २२ व्या 'जस्टा कॉझा राष्ट्रीय ट्रायल अॅडव्होकसी स्पर्धा २०२५' मध्ये विजेतेपद पटकावले आहे. तर स्पर्धेतील 'सर्वोत्कृष्ट वकील' हा वैयक्तिक पुरस्कार अदिती अजित अंकुश (Aditi Ankush) हिने पटकावला आहे. या शिवाय, सर्वोत्कृष्ट मेमोरियलचा पुरस्कारही याच संघाला मिळाला. ही स्पर्धा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेजतर्फे आयोजित करण्यात आली होती.
असा होता संघ -या संघात अदिती अजित अंकुश आणि जय प्रदीप गवाडे (दोघेही- LLB 4th year) यांचा समावेश होता. विजेत्या संघाने प्राथमिक फेरीत यशस्वी कामगिरी करत पहिल्या चार संघांमध्ये स्थान मिळवत उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीचे परीक्षण नागपूर उच्च न्यायालयातील वरिष्ठ वकिलांनी केले होते.
यानंतर, स्पर्धेची अंतिम फेरी नागपूर विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात पार पडली. या फेरीचे परीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या विद्यमान न्यायमूर्ती एम. एस. जवळकर तथा न्यायमूर्ती ए. एल. पानसरे यांनी केले. स्पर्धेचे बक्षीस वितरण न्यायमूर्ती अविनाश घरोटे यांच्या हस्ते करण्यात आले.