जालना : महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने प्रलंबित विविध मागण्यांसाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. संघटनेच्या सदास्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. १० मार्च ते १ मे २०१६ दरम्यान संघटनेच्या वतीने विविध प्रकारच्या आंदोलनाचा कार्यक्रम आखण्यात आला आहे. निवेदनात म्हटले आहे की, महसूल विभागातील नायब तहसीलदार संवर्गातील पदे पदोन्नतीने भरण्यात यावीत, लिपिक पदाचे महसूल सहाय्यक असे नामकरण करावे, त्या पदाचा ग्रेड पे वाढवून मिळावा, शिपाई संवर्गातून तलाठी संवर्गात पदोन्नती करण्यात यावी, २००५ नंतर नियुक्ती दिलेल्या कर्मचाऱ्यांना सेवा निवृत्तीचे लाभ देण्यात यावेत, महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले लक्षात घेता जास्तीत जास्त शिक्षेची तरतूद असणारा कायदा करण्यात यावा, महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्यात यावे, नायब तहसीलदारांचा ग्रेड पे ४६०० रूपये करण्यात यावा, कोतवालांना चतुर्थ श्रेणी दर्जा द्यावा, शिपाई संवर्गात वारसा हक्काने त्यांच्या पाल्यास सेवेत सामावून घेणे आदी विविध मागण्यांसाठी महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन केले. निवेदनावर व्ही.डी.म्हस्के, पी.बी.मते, एस. एम. जोशी, रवि कांबळे, राहू निहाळ, एन.डी.घोरपडे, शरद नरोडे, बी.एम. रोकडे, विनोद भालेराव, प्रीती चौधरी, छाया कुलकर्णी, एस.एच.बर्डे, अरविंद चौबे यांच्यासह पदाधिकारी व सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (प्रतिनिधी)
महसूल कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन
By admin | Updated: April 20, 2016 23:23 IST