औरंगाबाद : क्रांतीचौक येथील नगर भूमापक क्रमांक १७३३५ या मिळकतीवर २००२ च्या सुधारित विकास आराखड्यानुसार तीन प्रकारचे आरक्षण टाकण्यात आले आहे. ते आरक्षण उठविण्याच्या हालचाली पालिकेने ११ नोव्हेंबरच्या सभेत ऐनवेळी प्रस्ताव घुसवून पूर्ण करून घेतल्या. आता तो ठराव रद्द करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी सूचक, अनुमोदकांनी महापौर कला ओझा यांना पत्र देण्याचा विचार केल्याची माहिती हाती आली आहे. आरक्षित जागांवरील आरक्षण उठविण्याप्रकरणात न्यायालयाने २००७ मध्ये सुमोटो याचिका दाखल करून घेतली आहे, असे असतानाही मनपाने क्रांतीचौकातील जागेवरील पार्किंग, उद्यानाचे आरक्षण उठविण्याचा ठराव मंजूर केला. त्यामुळे सूचक, अनुमोदकांची चांगलीच गाळण उडाली आहे. माजी विरोधी पक्षनेते डॉ. जफरखान, नगरसेवक हुशारसिंग चौहान, अफसरखान यांनी ११ नोव्हेंबरच्या सभेतील इतिवृत्त नामंजूर करण्याची मागणी करणारे पत्र महापौरांना दिले आहे. याप्रकरणी महापौरांशी संपर्क केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.