उस्मानाबाद : जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात रविवारी मतमोजणी पार पडली. यात उस्मानाबाद आणि परंडा हे मतदारसंघ राष्ट्रवादीकडे, उमरगा शिवसेना तर तुळजापूर मतदारसंघ काँग्रेसकडे राहिला आहे. काँग्रेसचे मधुकरराव चव्हाण यांना चौथ्यांदा मतदारसंघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली असून, राष्ट्रवादीचे राहुल मोटे यांनीही हॅट्ट्रीक साधली आहे. तसेच उमरग्याचे ज्ञानराज चौगुलेही सलग दुसऱ्या वेळी विजयी झाले आहेत. या निवडणुकीत भाजपाला मात्र खातेही उघडता आलेले नाही. रविवारी सकाळी आठ वाजता चारही मतदारसंघात मतमोजणीस सुरूवात झाली. प्रारंभी टपाली मतपत्रिकांची मोजणी करण्यात आली. यानंतर ईव्हीएम यंत्राद्वारे मतमोजणीस प्रारंभ झाला. साधरणत: अर्ध्या तासातच पहिला फेरीचा कल हाती येण्यास सुरुवात झाली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने फेरीनिहाय निकाल जाहीर होत होते. यावेळी मतमोजणी केंद्राबाहेर पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी निकाल ऐकण्यासाठी मोठी गर्दी केली होती. जिल्ह्यात सर्वात अगोदर परंडा मतदारसंघाचा निकाल घोषित करण्यात आला. या मतदारसंघात दहा उमेदवार रिंगणात होते. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल मोटे यांनी ७८ हजार ५४८ मते घेऊन विजय मिळविला. तर दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले ज्ञानेश्वर पाटील यांना ६६ हजार १५९ मते मिळाली. रासपचे बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर ३७ हजार ३२४, काँग्रेसचे अॅड. नुरूद्दीन चौधरी यांना ७ हजार ७६०, बसपाच्या संगीता आगवणे १ हजार २५६, मनसेचे गणेश शेंडगे यांना २ हजार ४२६ तर हिंदुस्थान जनता पार्टीचे त्रिंबक राजगुरू यांना ६९५ मते मिळाली. या मतदारसंघात १ लाख ९७ हजार १०८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या उमरगा मतदारसंघात एकूण तेरा उमेदवार रिंगणात होते. येथे शिवसेनेचे ज्ञानराज चौगुले यांनी किसन कांबळे यांचा २० हजार ४४२ मतांनी पराभव केला. चौगुले यांना ५८८ टपाली मतांसह ६५ हजार १७८ तर त्यांचे प्रतिस्पर्धी किसन कांबळे यांना ३६३ टपाली मतांसह एकूण ४४ हजार ७३६ मते मिळाली. भाजपाचे कैलास शिंदे हे ३० हजार ५२१ मते घेऊन तिसऱ्या तर राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. संजय गायकवाड हे १५ हजार ५६९ मते घेऊन चौथ्या क्रमांकावर राहिले. दत्ता गायकवाड (बसपा) यांना १६७५, प्रा. विजय क्षीरसागर (मनसे) १४५९, चंद्रकांत थोरात (भारतीय नौजवान सेना पक्ष) ४२१ आणि विद्या वाघमारे (रिपाइं) यांना १८३ मते मिळाले. तुळजापूर मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार मधुकरराव चव्हाण यांनी परिवहन महामंडळाचे विद्यमान अध्यक्ष जीवनराव गोरे यांचा २९ हजार ६१० मतांनी पराभव केला. या मतदारसंघात एकूण २ लाख १७ हजार ४०८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी १,३१४ मते नोटाला मिळाली तर सहा मते बाद झाली. येथे चव्हाण यांनी ७० हजार ७०१ मते प्राप्त करून विजय मिळविला. जीवनराव गोरे यांना ४१ हजार ९१ मते मिळाली. रिंगणात असलेले भाजपाचे उमेदवार संजय निंबाळकर यांना ३६ हजार ३८०, मनसेचे देवानंद रोचकरी यांना ३५ हजार ८९५, तर शिवसेनेचे सुधीर पाटील यांना २४ हजार ९९१ मते पडली. याशिवाय बसपाचे प्रेमानंद डोरनाळीकर २ हजार ४०५, सतीश कसबे (महाराष्ट्र विकास आघाडी) ८९३, आणि राहुल नागनाथ जवान (हिंदुस्थान जनता पार्टी) यांना ३८५ मते मिळाली. सर्वाधिक वीस उमेदवार रिंगणात असलेल्या उस्मानाबाद मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात लढत झाली. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे राणाजगजितसिंह पाटील यांनी ८८ हजार ४६९ मते मिळवून विजय प्राप्त केला. त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना ७७ हजार ६६३ मते मिळाली. भाजपाचे संजय पाटील दुधगावकर यांनी २६ हजार ८१ मते मिळविली. याशिवाय बसपाचे जयराम घुले यांना २ हजार ५३१, काँग्रेसचे विश्वास शिंदे यांना ९ हजार ८१, मनसेचे संजयकुमार यादव ६४४, एमआयएमचे अकबरखाँ गुलाबाखाँ पठाण यांना ४ हजार ५५५, रिपब्लिकन बहुजन सेनेचे अनिल हजारे ६५४, बहुजन मुक्ती पार्टीचे उमेश भालेराव यांना २२३, धनंजय तरकसे (हिंदुस्थान निमारण दल) १४८, मधुकर गायकवाड (आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडिया) २८३ आणि रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे रमेश बनसोडे यांना अवघी १९५ मते मिळाली. याशिवाय आठ अपक्षही रिंगणात होते. या मतदारसंघात ६२१ मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला. निकाल घोषित झाल्यानंतर उस्मानाबाद शहरातील चौकाचौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून तसेच गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा केला. तसेच विजयी उमेदवारा राणाजगजितसिंह पाटील यांचीही शहरातून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मोटेंची हॅटट्रीक, चव्हाणांचा चौकार
By admin | Updated: October 20, 2014 00:32 IST