औरंगाबाद: कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील इयत्ता ८ वीपासूनचे वर्ग भरविण्यास शाळांना परवानगी देण्यात आली. मुलांच्या भवितव्याचा विचार करून पालक मुलांना शाळेत पाठविण्यास तयार झाले आहेत; मात्र तिसऱ्या लाटेच्या बातम्यांमुळे छातीवर दगड ठेवून पालक मुलांना शाळेत पाठवित असल्याचे समोर आले. कोरोनाची धास्ती कायम असल्यामुळे पाल्याला कोरोना संसर्ग होऊ नये,याकरिता पालकही खबरदारी घेताना दिसतात.
ज्या गावांत कोरोनाचा एकही रुग्ण नाही, त्या गावांत ८ वी पासूनचे वर्ग भरविण्यास शासनाने परवानगी दिली आहे. शासनाच्या आदेशाने औरंगाबाद जिल्ह्यातील ८ वी ते १० पर्यंतच्या १ हजार २४७ शाळा सुरू झाल्या आहेत. असे असले तरी कोरोनाची साथ अद्याप पूर्णपणे थांबली नाही. तिसऱ्या लाटेची चर्चाही जोरात सुरू झाली. असे असताना मुलांच्या भवितव्याचा विचार करून ग्रामीण भागातील पालकांनी त्यांच्या मुला,मुलींना शाळेत पाठविण्यास सुरुवात केली. आपल्या पाल्यांना शिकविणारा शिक्षक शहरातून ये- जा करीत असतो. यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी त्यांना सतावत असल्याचे पालकांनी लोकमतला सांगितले. गावांत शिकवणी वर्ग नाही आणि शिकवणी वर्गावर खर्च करणेही अनेकांना परवडत नाही. यामुळे आपण मुलांना शाळेत पाठविण्याचा निर्णय घेतल्याचे काही पालकांनी सांगितले. आपल्या पाल्याला शाळेत पाठविताना त्याला मास्क काढू नको, साबणाने हात धुवावे अथवा सॅनिटायझरचा वापर करण्याच्या सूचना देण्यात येतात,असेही पालकांनी सांगितले. शाळेतून घरी आल्यावर त्याने आंघोळ करावी आणि कपडे धुण्यास टाकायला सांगितले जाते.
------------------------------------------------------------------------------
चौकट
औरंगाबाद जिल्ह्यातील एकूण शाळा - ४ हजार ६०६
सुरू झालेल्या शाळा- १२४७
बंद असलेल्या शाळा-३ हजार ३५९
---------------------------------------
काय काळजी घ्यावी
१)शाळेत गेल्यावर विद्यार्थ्यांनी मास्क काढू नये.
२)वारंवार हात साबणाने धुवावा किंवा सॅनिटायझरचा वापर करावा.
३) सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे
४) शाळेतून आल्यावर कपडे धुवायला टाकावेत आणि साबणाने आंघोळ करावी.
---------------------------------
पालकांची प्रतिक्रिया
कोरोना परिस्थितीमुळे दीड वर्षापासून शाळा बंद होत्या. आता माझी मुलगी दहावीत गेली. तिच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या वळणावर तिचे शिक्षण होऊ शकले नाही. खेड्यात आम्हाला खासगी शिकवणी उपलब्ध होऊ शकत नाही. यामुळे एकीकडे शाळा सुरू झाली हे चांगले झाले. दुसरीकडे कोरोनाची मनात भीती देखील आहे.
- मंदा ज्ञानेश्वर घावटे (रा.सटाणा)
-----------------------------------------------------------
बरं झालं गावातील जिल्हा परिषद शाळा सुरू झाली. माझा मुलगा शाळेत देखील जात आहे. आमचा ऑनलाइन शिक्षणावर भरवसा नाही. मुले शाळेत असेल तर त्यांचे शिक्षणही होते आणि त्यांना वळणही चांगले लागते. शाळा सुरू झाल्याचा आनंद आहे, मात्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने चिंता वाढविली आहे.
- वनिता अशोक कचकुरे (शेंद्रा कमंगर)
----------------------------------------------------------
-
करमाड गावात पुन्हा कोरोना सकारात्मक रुग्ण आढळून आल्याने जिल्हा परिषद शाळेचे वर्ग आमच्या हिवरा गावातील मंदिरात भरत आहेत. हिरवा गावांत कोविडचा एकही रुग्ण नाही. गावांतच शाळा भरत असल्याने कोरोनाची भीती कमी वाटते. असे असले तरी अद्यापही कोरोनाची साथ पूर्णपणे संपलेली नाही. शिवाय तिसऱ्या लाटेविषयी बातम्या झळकू लागल्याने मुलांच्या आरोग्याविषयी धास्ती वाढली.
-पद्मा कल्याण पिंपळे (रा. हिवरा, ता.औरंगाबाद)