हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील कळमकोंडा येथील सुरेखा मदन बोकसे (वय २४) यांनी मंगळवारी एका खासगी रूग्णालयात चार बाळांना जन्म दिला. दिवस भरले नसल्यामुळे मातेचे सीझेरियन करून बाळांना आयुष्य देण्यात डॉक्टरांना यश आले. विशेषत: चारही बाळ व्यवस्थित असून लाखातून एखादवेळी अशी घटना घडत असल्याचे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. कांचन बगडिया यांनी सांगितले.बोकसे या प्रसुतीसाठी हिंगोली तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे येथे माहेरी आल्या होत्या. पोटात चार गर्भ असल्याचे समजताच या मातेचे त्राण गळाले होते. अस्वस्थ मातेला धीर देत मागील दहा दिवसांपासून डॉ. बगडिया तिच्यावर उपचार करीत होत्या. मंगळवारी रात्री दीड वाजता या मातेला प्रसवपीडा सुरू झाल्या. प्रसुतीसाठी दिवसही भरले नसल्याने या मातेचे सीझेरियन करावे लागले. त्यासाठी डॉ. कांचन बगडिया, शल्यचिकित्सक डॉ. सचिन बगडिया, बालरोग तज्ज्ञ डॉ. स्नेहल नगरे, डॉ. एस. एम. माळी, डॉ. नितीन अग्रवाल, डॉ. सारंग पाठक, डॉ. पूजा पाठक यांचा शस्त्रक्रिया पथकात समावेश होता. सीझेरियनअंती या मातेने दोन मुली व दोन मुलांना जन्म दिला; परंतु एक मुलगा व एका मुलीचे वजन प्रत्येकी १ किलो असल्यामुळे दोघांना सामान्य रुग्णालयात कृत्रिम श्वास देण्यात आला आहे. उर्वरित दोन बाळांचे वजन १ किलो ४०० ग्राम असल्यामुळे दोन ते तीन आठवडे त्यांना इनक्युबेटरमध्ये ठेवावे लागणार आहेत. आजघडीला बाळांची आणि तिच्या मातेची प्रकृती चांगली आहे. (प्रतिनिधी)
मातेने दिला ४ मुलांना जन्म
By admin | Updated: September 12, 2014 00:04 IST