औरंगाबाद : घाटी रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या महिलेने एका स्त्री जातीच्या मृत अर्भकाला जन्म दिला. त्यानंतर तासाभरात ती आणि तिचे नातेवाईक अर्भकाला घाटीत सोडून पसार झाले. ही घटना १७ आॅक्टोबर रोजी उत्तररात्री घडली. याप्रकरणी आज बेगमपुरा पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याविषयी अधिक माहिती देताना बेगमपुरा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक एन.जी. बनसोड यांनी सांगितले की, कविता (पूर्ण नाव आणि पत्ता नाही) नावाच्या महिलेस प्रसूती वेदना होत असल्याने तिचे नातेवाईक तिला १७ रोजी उत्तररात्री २ वाजेच्या सुमारास घाटीत घेऊन आले. अपघात विभागाच्या डॉक्टरांनी तिला थेट प्रसूतीगृहात (लेबर रूम) घेऊन जाण्याचे नातेवाईकांना सांगितले. त्यानुसार ते सर्व जण दुसऱ्या मजल्यावरील स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागात गेले. डॉक्टरांनी तिला थेट लेबर रूममध्ये घेतले. तेथे जाताच तिने एका स्त्री जातीच्या मृत अर्भकास जन्म दिला. ही बाब कविता आणि तिच्या नातेवाईकांना सांगितली.अपघात विभागात जाऊन तिच्या नावाची नोंदणी करून येण्याचे सांगितले. त्यानुसार सोबत असलेले तिचे नातेवाईक नोंदणी करण्यासाठी गेले आणि परत आलेच नाही. प्रसूतीच्या तासाभरानंतर कविता हीसुद्धा लघुशंकेला जाते असे सांगून वॉर्डातील कर्मचाऱ्यांची नजर चुकवून तेथून पळून गेली. रात्रपाळीच्या डॉक्टर, नर्सिंग कर्मचाऱ्यांची ड्यूटी संपत आल्याने त्यांनी वॉर्डातील सर्व बाळ आणि त्यांच्या आईची माहिती घेतली तेव्हा कविता आणि तिचे नातेवाईक फरार झाल्याचे त्यांना समजले. त्यानंतर त्यांनी ही बाब विभागप्रमुख, वैद्यकीय अधीक्षक, अधिष्ठाता यांना कळविली. अधिष्ठातांनी बेगमपुरा पोलीस ठाण्याला या घटनेची माहिती दिली. बेगमपुरा पोलिसांनी या प्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
मृत अर्भकाला सोडून माता फ रार
By admin | Updated: October 19, 2014 00:40 IST