औरंगाबाद : महापालिकेने समांतर जलवाहिनीसाठी १००, महावितरणची थकबाकी देण्यासाठी १००, असे २०० कोटी रुपयांचे कर्ज २०११-१२ मध्ये काढले आहे. या कर्जासाठी अब्जावधी किमतीची मालमत्ता आयडीबीआय बँकेकडे गहाण ठेवण्याचा करार मनपाने डिसेंबर २०११ मध्येच केला आहे. तब्बल ३ वर्षांनी २० डिसेंबरच्या सभेत १३ मालमत्ता गहाण ठेवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. आलेल्या आक्षेप, हरकतींची सुनावणी न घेताच मालमत्ता तीन वर्षांपूर्वीच्या कराराच्या अधीन राहून गहाण ठेवण्यात येणार आहे. या प्रकरणी फक्त २ आक्षेप आले आहेत. त्यावर सुनावणी झालेली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. औरंगपुऱ्यातील नाथ सुपर मार्केट, गारखेडा रिलायन्स मॉलमधील मनपा मालकीची जागा, झांशी की राणी उद्यान परिसर आणि पदमपुऱ्यातील फायर ब्रिगेड कॉम्प्लेक्ससह १३ मोक्याच्या ठिकाणांवरील मालमत्ता आयडीबीआय बँकेकडे गहाण ठेवण्यात येणार आहेत. बाजारभावानुसार या मालमत्तांची किंमत काही अब्जावधी रुपयांत जाते. यापूर्वी मनपाने १७ मालमत्ता बँकेकडे गहाण ठेवल्या आहेत. मनपाने यापूर्वी गहाण ठेवलेल्या मालमत्तेचे मूल्यांकन बँकेने १७० कोटी रुपये काढले आहे. त्यामुळे पालिकेला दरमहाच्या व्याज व मुद्दलफेडीच्या रकमेत १ टक्का जास्त व्याज लागते.
सुनावणी न घेताच मालमत्ता ठेवणार गहाण
By admin | Updated: December 17, 2014 00:38 IST