परभणी : जागोजागी कचर्याचे ढिगारे, त्यावर चरणारे जनावरे आणि नाल्या तुंबल्याने साचलेले पाण्याचे डबके हे चित्र शहरात अनेक ठिकाणी पहावयास मिळते. स्वच्छतेसाठीच कोणी पुढाकार घेत नाहीतर पर्यावरणाचे संतुलन राखण्याचे प्रयत्न तर दूरच राहिले. शहरात अनेक भागांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव आहे. नाल्या तुंबलेल्या आहेत. ठिकठिकाणी कचर्याचे ढिगारे साचले असल्याने शहरातील वातावरण प्रदूषित होत आहे. शहर स्वच्छतेची जबाबदारी महानगरपालिकेवर आहे. परंतु, या कामात मनपा अपयशी ठरली आहे. मुख्य शहरी भागाबरोबरच शहराबाहेरील वसाहतीमध्येदेखील हीच परिस्थिती आहे. कचर्याचे ढिगारे आणि नाल्यांतील घाण पाण्यामुळे शहरामध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. नाल्यांवर वेळोवेळी फवारणी देखील केली जात नाही. स्वच्छता हा मूलभूत प्रश्न आहे. शहर स्वच्छ राहिले तर पर्यावरणदेखील चांगले राहील. मुळात स्वच्छतेकडेच दुर्लक्ष होत असल्याने पर्यावरणाचा प्रश्न निर्माण होत आहे. (प्रतिनिधी) प्रदूषण नियंत्रण कार्यालय नावालाच परभणी येथे प्रदूषण नियंत्रण कार्यालय कार्यरत आहे. या कार्यालयामार्फत वायू, ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याचे काम केले जाते. दिवाळी सणाच्या निमित्ताने होणार्या ध्वनी प्रदूषणाच्यासंदर्भात जाहीर आवाहन करण्या पलीकडे या कार्यालयाचा जिल्ह्यासाठी उपयोग होत नाही. ध्वनी प्रदूषणाची नोंद घेण्यासाठी पुरेशी यंत्रसामग्रीही उपलब्ध नसल्याने ध्वनी प्रदूषण किती प्रमाणात होत आहे, याची देखील नोंद होत नाही. झाडांच्या संगोपनाकडे दुर्लक्ष पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षलागवड हाती घेतली जाते. परंतु, लावलेल्या झाडांचे संगोपन होत नसल्याने ही मोहीम अयशस्वी ठरते. धुळीचा प्रादुर्भाव शहरातील रस्त्यांची मागील दोन वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. वाहनांची वाढलेली वर्दळ आणि रस्त्यांवर खड्डे यामुळे शहरात धुळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचून ही धूळ अधिकच वाढली आहे. वाहनधारक आणि सर्वसामान्य नागरिकांना या धुळीचा सामना करावा लागतो. धुळीमुळे श्वसनाचे आजारदेखील बळावले आहेत. वायू प्रदूषण वाढले मागील काही वर्षांपासून शहरात वाहनांची संख्या वाढली आहे. जुनी वाहनेदेखील मोठ्या प्रमाणात आहेत. पेट्रोलचे भाव वाढत असल्याने अनेक वाहनांमध्ये रॉकेलचादेखील वापर केला जातो. त्यामुळे रॉकेलमिश्रित इंधन वापरल्याने वायू प्रदूषण वाढत आहे. विशेष करुन अॅटो आणि चार चाकी वाहनांमध्ये रॉकेलचा वापर केला जात आहे. परंतु, याविरुद्ध कुठलीही कारवाई होत नाही.
वृक्षारोपणाऐवजी तोडच अधिक; प्लास्टिकचा वापरही अमर्याद
By admin | Updated: June 5, 2014 00:10 IST