लातूर : वरवंटी कचरा डेपो येथील यांत्रिक प्रक्रिया प्रकल्प १८ आठवड्यांच्या आत सुरू करण्याचे व साठलेल्या कचऱ्यावर सहा महिन्यांच्या आत प्रक्रिया करण्याचे आदेश राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणाने दिले होते. मात्र या दोन्ही आदेशाचे पालन मनपाकडून झाले नाही. परिणामी, एक आठवड्याच्या आत मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी, प्रदूषण मंडळाचे सदस्य सचिव यांची संयुक्त बैठक नगर विकास खात्याच्या सचिवांनी घेऊन डेपोवरील कचऱ्याच्या संदर्भात खर्चाच्या तरतुदीसह २० जानेवारीपर्यंत कृती आराखडा सादर करावा, असे निर्देश हरित न्यायाधीकरणाने दिले आहेत. वरवंटी कचरा डेपोवर साचलेल्या कचऱ्यामुळे उद्भवलेल्या समस्येच्या संदर्भात अमोल श्रीपती पवार, गुंडूराव रामकृष्ण गर्जे, हरिभाऊ राजाराम माने यांनी राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणात याचिका दाखल केली होती. न्यायाधीकरणाने २१ आॅक्टोबर २०१४ च्या आदेशान्वये कचरा डेपो येथील यांत्रिकी प्रक्रिया प्रकल्प १८ आठवड्यांच्या आत सुरू करण्याचे व कचरा डेपोवर साठलेल्या कचऱ्यावर सहा महिन्यांच्या आत प्रक्रिया करण्याचे आदेश दिले होते. परंतु, या दोन्ही आदेशांचे पालन महापालिकेने केले नाही. मुदतवाढ द्यावी, असा अर्ज तत्कालीन आयुक्त रवींद्र पांढरे यांनी केला होता. मात्र मुदतवाढ राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणाने नाकारली असून २० जानेवारीपर्यंत नगर सचिवांनी जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, प्रदूषण मंडळाचे सचिव यांची एकत्र बैठक घेऊन कृती आराखडा सादर करावा. तो निधीच्या तरतुदीसह २० जानेवारीपर्यंत सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
हरित न्यायाधिकरणाची मनपाला सूचना
By admin | Updated: January 10, 2017 23:42 IST