जालना : पैसे देत नाही या कारणावरून मुलगी आणि नातवाने डोक्यात वरवंटा घालून आईचा खून केल्याची घटना बुधवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास जुना जालन्यातील गवंडी मज्जित येथे घडली. मुमताज काझी हसन चाऊस (६०) मृत महिलेचे नाव आहे.मुमताज या मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत होत्या. त्यांच्या शेजारीच राहणारी त्यांची मुलगी शेख शबाना शेख सलीम आणि नातू शेख फिरोज शेख सलीम हे नेहमीच मुमताज यांना पैसे मागत असे. आपली मुलगीच असल्याने त्यांनी अनेकवेळा त्यांना पैसे दिले होते. परंतु बुधवारी रात्री आठवाजेच्या दरम्यान शबाना आणि फिरोजने पैसे देण्यासाठी तगादा लावला. मुमताज यांनी पैसे देण्यास नकार दिला राग अनावर झाल्याने फिरोजने मुमताज यांचे डोके जोरात भिंतीवर आपटले. त्यातच त्या बेशुध्द पडल्या. शबाना आणि फिरोज यांनी घरातील पाटा आणि वरवटा मुमताज यांच्या डोक्यात घातला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. नजजोद्दीन बद्रोद्दीन काजी (रा. माळीपुरा) यांच्या फिर्यादीवरून शेख शबाना शेख सलीम, शेख फेरोज शेख सलीम यांच्याविरूध्द कदीम जालना पोलीस ठाण्यात भादंवि ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांनाही पोलिसांनी गुरूवारी सकाळी अटक केली. (प्रतिनिधी)
जालन्यात पैशांसाठी मुलीने केला जन्मदात्या आईचा खून
By admin | Updated: November 18, 2016 00:58 IST