लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बीडमधील सराईत गुन्हेगार असणाऱ्या आठवले टोळीविरूद्ध ‘मोक्का’ [महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९] अंतर्गत कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. यासाठी पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी अहवाल पाठविला होता. याला विशेष पोलीस महानिरीक्षक मिलींद भारंबे यांनी परवानगी दिली आहे. या टोळीत अक्षय व सनी आठवलेसह चौघांचा समावेश आहे. या चौघांचाही स्थानिक गुन्हे शाखेकडून शोध घेतला जात आहे. शहरातील मोंढा भागात ११ मे रोजी राजविला हॉटेलमध्ये राजू केदार नगरे [२०] याच्यावर गावठी पिस्तूलद्वारे गोळीबार झाला होता. तसेच नगरेला बेदम मारहाण झाली होती. या प्रकरणात अक्षय आठवले, सनी आठवले, विकी जाधव, शुभम वाघमारे यांच्यावर पेठ बीड ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. या गुह्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी आठवले टोळीची पार्श्वभूमी तपासली. अक्षय व सनी आठवले हे सख्खे भाऊ असल्याचे निदर्शनास आले. तसेच २०१२ पासून ते गुन्हेगारी क्षेत्रात कार्यरत असल्याची माहिती समोर आली. त्यांच्यावर आतापर्यंत विविध प्रकारचे नऊ गुन्हे दाखल आहेत. पेठ बीड ठाण्यात पाच, बीड शहर, शिवाजीनगर व बीड ग्रामीण ठाण्यात प्रत्येकी एक व गोंदी [जि. जालना] येथील ठाण्यातील एका गुन्ह्याचा समावेश आहे. खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, अवैध शस्त्र बाळगणे, शस्त्रांची खरेदी-विक्री करणे अशा गंभीर गुन्ह्यांत त्यांचा सहभाग आहे. अधीक्षक जी. श्रीधर यांनी पेठ बीड ठाण्याचे निरीक्षक अनिल कुमार जाधव यांना आठवले टोळीविरूद्ध मोक्का अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार १८ जून रोजी अधीक्षक श्रीधर यांनी यासंदर्भातील प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांच्याकडे पाठविला. भारंबे यांनी या गुन्ह्यास मोक्का कायद्यांतर्गत कलम वाढविण्यास परवानगी दिली.
आठवले टोळीविरुद्ध ‘मोक्का’!
By admin | Updated: July 9, 2017 00:31 IST