औरंगाबाद : आरटीओ कार्यालयात लर्निंग लायसन्स संगणकीय प्रणालीत एकाच वेळी जवळपास ३० जणांना चाचणी देण्याची सुविधा बसविण्यात आली आहे; परंतु यामध्येही काही उपकरणे बंद आहेत. शिवाय ही यंत्रणा जुनी झाल्याने बिघाड होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. वाहन चालविण्याचा शिकाऊ परवाना मिळविण्यासाठी वाहनधारकांना जवळपास चार ते पाच दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे चाचणी यंत्रणा बदलण्यासाठी आरटीओ कार्यालयाकडून प्रयत्न केले जात असून, याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.प्रादेशिक परिवहन कार्यालयात दररोज लर्निंग लायसन्स काढण्यासाठी आलेल्यांची मोठी गर्दी दिसून येते. लर्निंग लायसन्ससाठी वाहनधारकांना संगणकीय चाचणी द्यावी लागते. काही दिवसांपूर्वी सॉफ्टवेअरमध्ये बिघाड झाल्याने दोन दिवस ही संगणकीय चाचणी यंत्रणा बंद पडली. त्यामुळे शिकाऊ परवाना मिळविण्यासाठी शहर आणि परिसरातून आलेल्या वाहनधारकांना माघारी फिरावे लागले. आरटीओ कार्यालयात वाहन चालविण्याचा शिकाऊ परवाना मिळविण्यासाठी अर्ज भरण्यापासून चाचणी देण्याची प्रक्रिया उमेदवारांकडून पार पाडली जाते. तासन्तास रांगेत उभे राहून अर्ज भरण्याची वेळ उमेदवारांवर येते. शिवाय चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतरही अनेकांना शिकाऊ परवाना मिळविण्यासाठी चार ते पाच दिवस वाट बघावी लागते. लर्निंग लायसन्स मिळविण्यासाठी आरटीओ कार्यालयात वारंवार चकरा मारण्याची वेळ अनेकांवर येते. परंतु लर्निंग लायसन्स मिळविण्यासाठीची ही स्थिती इतिहासजमा करण्यासाठी आरटीओ कार्यालयाकडून प्रयत्न केला जात आहे. आधुनिक अशी संगणकीय चाचणी प्रणाली बसविण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
लर्निंग लायसन्स चाचणी यंत्रणा होणार आधुनिक
By admin | Updated: August 19, 2014 02:17 IST