औरंगाबाद : विधानसभेच्या आदर्श आचारसंहितेच्या पालनासाठी आवाहन केले जात असले, तरी जिल्ह्यात सातत्याने आचारसंहिता भंगाच्या घटना घडत आहेत. त्यामुळे आतापर्यंत राजकीय व्यक्तींविरुद्ध आचारसंहिता भंगाचे तब्बल ४५ गुन्हे दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे कार्यकर्त्यांबरोबरच सहा उमेदवारांविरुद्धही असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.राज्यात १२ सप्टेंबरपासून विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. तेव्हापासून जिल्ह्यातील सर्व नऊ विधानसभा मतदारसंघांत प्रशासनाकडून राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवले जात आहे. विनापरवानगी राजकीय पक्षांचे झेंडे लावणे, स्टीकर लावणे, विनापरवानगी सभा घेणे, विनापरवानगी लाऊड स्पीकर लावणे, वाहन धावत असताना लाऊड स्पीकर सुरू ठेवणे आदी बाबी आढळल्यास त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले जात आहेत. याशिवाय भरारी पथकांकडून वाहनांची झडती घेतली जात आहे. वाहनांच्या झडतीत आतापर्यंत सुमारे अडीच कोटी रुपयांहून अधिक रक्कम आणि मुद्देमाल आढळून आला. आचारसंहिता कक्षाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात १६ सप्टेंबरपासून ९ आॅक्टोबरपर्यंत एकूण ४५ गुन्हे दाखल झाले आहेत. यात सर्वाधिक १३ गुन्हे हे पैठण विधानसभा मतदारसंघाअंतर्गत दाखल झाले आहेत. त्यापाठोपाठ फुलंब्री मतदारसंघात ९, औरंगाबाद मध्य मतदारसंघात ५, औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात ३, औरंगाबाद पूर्व मतदारसंघात २, सिल्लोड मतदारसंघात ४, कन्नड मतदारसंघात ३ आणि गंगापूर मतदारसंघात ६ गुन्हे दाखल झाले आहेत.
आदर्श आचारसंहिता भंगाचे जिल्ह्यात ४५ गुन्हे दाखल
By admin | Updated: October 11, 2014 00:40 IST