वाळूज महानगर : एका अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्यास जमावाने चोप दिल्याची घटना रविवारी (दि.१३) दुपारी २ वाजेच्या सुमारास वाळूज परिसरात घडली. या मारहाणीत जखमी झालेल्या विधिसंघर्ष बालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याविषयी अधिक माहिती अशी की, वाळूज परिसरातील एक अल्वयीन मुलगी दुपारी २ वाजेच्या सुमारास प्रात:विधीसाठी मोकळ्या जागेकडे चालली होती. यावेळी पाठीमागून आलेल्या अल्पवयीन मुलाने तिला रस्त्यात अडवून तिचा हात धरला व म्हणाला, तुझ्याशी मला काही बोलायचे आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे त्या अल्पवयीन मुलीने मदतीसाठी आरडाओरड केली असता नागरिकांनी घटनास्थळ गाठून छेड काढणाऱ्यास चांगलाच चोप दिला. या मारहाणीत छेड काढणारा घटनास्थळीच बेशुद्ध पडल्याची माहिती मिळताच वाळूज पोलीस ठाण्याचे पोकॉ. प्रदीप बोरुडे व पोकॉ. राजू डाखुरे यांनी घटनास्थळ गाठून जमावाची समजूत काढली. यानंतर १०८ रुग्णवाहिकेतून बेशुद्ध पडलेल्या त्या अल्पवयीन मुलास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले.
याप्रकरणी पीडितेच्या आजीने वाळूज पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी रुग्णालयातून उपचार घेतल्यानंतर विधिसंघर्ष बालकास चौकशीसाठी ताब्यात घेतले. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक विनायक शेळके करीत आहेत.
------------------------
उपचारासाठी दाखल केलेल्या इसमाचा मृत्यू
वाळूज महानगर : राहत्या घरी प्रकृती खालावल्यामुळे उपचारासाठी दाखल केलेल्या एका ४२ वर्षीय इसमाचा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला आहे.
राजू हिंमतराव जाधव (४२, रा. रांजणगाव) हे शनिवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास शौचालयात गेले असता त्यांना त्रास जाणवू लागला. यानंतर योगेश शेळके यांनी त्यांना उपाचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना ११ वाजेच्या सुमारास मयत घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
------------------
अपघातात जखमी तरुणाचा मृत्यू
वाळूज महानगर : वाळूज उद्योगनगरीत अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका ३२ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला आहे. संदीप आनंदराव देशमुख (रा. बजाजनगर) असे मयताचे नाव आहे.
संदीप आनंदराव देशमुख हा वाळूज एमआयडीसील एनआरबी चौकात १२ डिसेंबर रोजी रात्री १०.४५ वाजेच्या सुमारास अपघातात गंभीर जखमी झाला होता. या अपघाताची माहिती मिळताच १०८ रुग्णवाहिकेतून संदीप देशमुख यास बेशुद्धावस्थेत पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना रविवारी दुपारी १.४५ वाजेच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
--------------------------
उद्योगनगरीतून दुचाकी लांबविली
वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसीतील एका कंपनीच्या पार्किंगमधून दुचाकी लांबविणाऱ्या चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरेश विजय चव्हाण (रा.जोगेश्वरी) हे लेबर सुपरवायझर असून, ते दुचाकीने (एमएच २०, डीएम ६३८०) ११ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास इप्का कंपनीत गेले होते. कंपनीच्या पार्किंगमध्ये दुचाकी उभी करून काही वेळाने कंपनीतून परत आल्यावर त्यांना दुचाकी गायब असल्याचे दिसून आले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---------------------