औरंगाबाद : पाणीपुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी पहाटे मनपा प्रशासकांच्या दिल्ली गेट येथील बंगल्याच्या आवारात जाणारे पाण्याचे कनेक्शन तोडले; पण हे नळ कनेक्शन प्रशासकांच्या निवासस्थानाचे नसून बंगल्याच्या आवारातील उद्यानाचे असल्याने मनसेने भलतेच नळ कनेक्शन कापल्याचे समोर आले. दरम्यान, याप्रकरणी सहा कार्यकर्त्यांविरुद्ध सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मागील अनेक वर्षांपासून शहरातील पाणीपुरवठ्याची बिकट अवस्था झाली आहे. पाणीपुरवठ्याचे कोणतेही नियोजन महापालिकेकडे नाही. राज्यातील प्रमुख शहरांमध्ये सर्वाधिक पाणीपट्टी औरंगाबाद शहरात वसूल करण्यात येते. समान पाणी वाटप करावे या मागणीसाठी मनसेने दहा दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांच्या निवासस्थानाचे नळ कनेक्शन तोडण्याचा इशारा दिला होता. महापालिकेने या इशाऱ्यानंतरही कोणतीही कार्यवाही केली नाही. रविवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रशासकांच्या दिल्ली गेट येथील निवासस्थानात जाणारे दोन इंचाचे नळ कनेक्शन कटरच्या साह्याने कट केले. या प्रक्रियेचे फोटोसेशन करून आणि तेथे बॅनर लावून कार्यकर्ते निघून गेले. सोशल मीडियावर हा सर्व प्रकार व्हायरल करण्यात आल्यानंतर मनपा प्रशासनाला नळ कनेक्शन कापल्याचे लक्षात आले. मनसेचे जिल्हा संघटक बिपिन नाईक, वैभव मिटकर आदी कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले.
‘ते’ तर विहिरीचे कनेक्शन
मनपा प्रशासक पाण्डेय यांच्या ‘जलश्री’ निवासस्थानी मोठा बगिचाही आहे. बगिच्यासाठी दिल्ली गेट येथे एका विहिरीतून २ इंच पाइप टाकून कनेक्शन घेण्यात आले होते. मागील काही वर्षांपासून याचा वापरही बंद झाला होता. मनसेच्या कार्यकर्त्यांनी हे निवासस्थानाचे नळ कनेक्शन समजून तेच कनेक्शन तोडले.
‘जलश्री’मध्ये मोठी पाण्याची टाकी
मनपा प्रशासकांच्या निवासस्थानी मोठी पाण्याची टाकी आहे. या टाकीवरून आणि शाहगंज येथील पाण्याच्या टाकीवरून निवासस्थानाला स्वतंत्र नळ कनेक्शन देण्यात आले आहे. त्यामुळे मनसेला नळाचे मूळ कनेक्शन सापडले नाही.
मनपाकडून फौजदारी कारवाई
प्रशासकांच्या निवासस्थानाचे नळ कनेक्शन कापल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सहा कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कॅप्शन...
मनसेचे कार्यकर्ते पहाटे मनपा प्रशासकांच्या बंगल्यात जाणारा नळ कापत असताना. दुसऱ्या छायाचित्रात कापलेला नळ.