औरंगाबाद : मध्यवर्ती जकात नाका येथे महापालिकेच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात मागील काही वर्षांपासून एक्सपायरी डेटच्या औषधांचा राजरोसपणे वापर करण्यात येत असल्याची खळबळजनक बाब बुधवारी उघडकीस आली होती. या गंभीर घटनेची दखल घेऊन मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी २४ तासांत पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शाहेद शेख यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.पशुसंवर्धन विभागाचे प्रमुख डॉ. बी. एस. नाईकवाडे यांच्यावर अगोदरच मनपाने निलंबनाची कारवाई केली. नाईकवाडे यांच्या कार्यकाळात अनेक गैरव्यवहार सुरू असल्याची कुणकुण मनपा पदाधिकाऱ्यांना लागली होती. त्यांनी मागील आठ दिवसांपासून ‘आॅपरेशन पशुसंवर्धन विभाग’हाती घेतला आहे. या उपक्रमात महापौर त्र्यंबक तुपे, सभापती दिलीप थोरात, उपमहापौर प्रमोद राठोड, सभागृह नेता राजेंद्र जंजाळ यांनी बुधवारी जकात नाका येथील पशुवैद्यकीय दवाखान्यावर धाड टाकली. महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी चक्क एक्सपायरी डेटच्या औषधींचा राजरोसपणे वापर करीत असल्याचे निदर्शनास आले. २०१३-१४ मध्ये एक्सपायर झालेली औषधी जनावरांना देण्यात येत होती. या प्रकरणाची हकीकत मनपा पदाधिकाऱ्यांनी आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांच्या कानावर घातली होती. नाईकवाडे यांनी वेरूळ येथील एका जनरल स्टोअर्सवरून जनावरांची औषधी खरेदी केल्याची पावतीही सापडली. त्यामुळे औषध खरेदीतही मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.एक्सपायरी डेटच्या औषधांचा वापर केल्याबद्दल मनपाचे उपायुक्त अय्युब खान, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास जगताप यांनी पंचनामा करून आयुक्तांना अहवाल सादर केला. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शाहेद शेख यांना बुधवारीच कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. नोटीसचे उत्तर त्वरित द्यावे, असे सांगण्यात आले. शाहेद यांनी खुलासा सादर केला. त्यानंतर गुरुवारी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई आयुक्त बकोरिया यांनी केली.
मनपाचे पशुवैद्यकीय अधिकारी निलंबित
By admin | Updated: March 26, 2016 00:58 IST