बीड : येथील तहसील कार्यालयाकडे जात प्रमाणपत्र काढतेवेळी देण्यात आलेले विविध पुराव्यांची फाईल गायब असल्यामुळे आक्षेपकर्त्यांना जात प्रमाणपत्रांच्या मूळ संचिका मिळत नाहीत. याबाबत वेळोवेळी उप विभागीय अधिकारी कार्यालयाकडे तक्रारी करून देखील याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे.याबाबत अनेकवेळा मागणी करूनही संचिका नेमक्या गेल्या कोठे, हे शोधण्याकडे जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. मागील दोन महिन्यांमध्ये जात प्रमाणपत्राच्या मूळ संचिका गहाळ असल्याबाबतच्या तक्रारी वाढल्या आहेत. याविषयी उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे विचारणा केली असता, काही अधिकाऱ्यांनी सांगितले की, अनेक जात प्रमाणपत्राच्या संचिका शोधूनही सापडत नाहीत. ज्या आक्षेपकर्त्यांनी काही जणांच्या जात प्रमाणपत्राच्या संचिकाची मूळ प्रत माहितीच्या अधिकारात मागितली होती त्यांना संबंधित संचिका शोधूनही सापडत नाही, असे उत्तर देण्यात आले असल्याचे पाहावयास मिळत आहे.याबाबत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना संपर्क साधला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. जात प्रमाणपत्राच्या संचिकांचा गोंधळ तात्काळ थांबवावा, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)
जात प्रमाणपत्रांच्या संचिकाच गहाळ !
By admin | Updated: March 4, 2017 00:19 IST